सन २०२१ ते २०२२ हे वर्ष परभणी कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणुन साजरा करण्यात येत आहे. गेल्या पाच दशकापासुन मराठवाडा विभागातील कृषि विकासा करिता परभणी कृषि विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण माध्यमातुन महत्वाची भुमिक बजावत आहे. परभणी कृषि विद्यापीठाने कृषि शिक्षणाच्या माध्यमातुन मोठया प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण केले असुन हे कृषि पदवीधर विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. कृषिच्या पदवीधरांनी कोणत्याही क्षेत्रातात कार्य करतांना शेती व शेतकरी कल्याणाकरिता कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा तेवीसावा दीक्षांत समारंभ दिनांक २५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष तथा कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा डॉ सी डी मायी हे उपस्थित होते तर व्यासपीठावर कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, आमदार मा डॉ राहुल पाटील, दापोली येथील डॉ बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ संजय सावंत, डॉ एस टी बोरीकर, माजी कुलगुरू डॉ के पी गोरे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा ना श्री दादाजी भुसे पुढे म्हणाले की, नुकतेच महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा समावेश केला असुन यातही कृषि पदवीधर आपले योगदान देऊ शकतील. गेल्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात संशोधनाच्या आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांच्या वाण, कृषि औजारे आणि कृषि तंत्रज्ञान विकसित केले असुन हे तंत्रज्ञान शेतकरी बांधवाच्या बांधापर्यंत पोहचले पाहिजे. आज शेतकामाकरिता वाढता मंजुरांचा खर्च व योग्य वेळी शेतमंजुरांची कमतरता ही मोठी समस्या शेतक–यांपुढे आहे. कृषि यांत्रिकीकरणास चालना देण्याकरिता संशोधनाच्या माध्यमातुन कृषि विद्यापीठाने शेतकरी बांधवाच्या किफायतीशीर व गरजेचे नुसार कृषि अवजारे व यंत्राचा निर्मिती करण्यावर भर देण्याची गरज आहे. अनेक शेतकरी स्वत: आपल्या शेतीत चांगले प्रयोग करतात, या शेतक-यांच्या प्रयोगास विद्यापीठाने संशोधनात समावेश करावा. राज्याचे मुख्यमंत्री मा श्री उध्दवजी ठाकरे साहेब शेतीकरी बाधवाप्रती संवेदनशील असुन ते नेहमीच म्हणतात शेतकरी चिंतामुक्त झाला पाहिजे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव परिस्थिती व लॉकडाऊन काळात मोठया प्रमाणात संपुर्ण मानव जातीचे जनजीवन ढवळुन निघाले. परंतु या काळात शेती व शेतकरी हे थांबले नाहीत, शेतीतील कामे अविरत चालु होती. कोठेही अन्नधान्य, फळ व भाजीपाला कमी पडला नाही की भाव वाढले नाही, याचे सर्व श्रेय शेतकरी बांधवानांच जाते. केवळ पिकांचे उत्पादन वाढ करून शेतकरी बांधवाची परिस्थितीत फरक पडणार नसुन उत्पन्न वाढीकरिता प्रयत्न करावे लागतील. माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकेल ते पिकेल’ अभियान प्रारंभ करण्यात आला. यात शेतकरी बांधव आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यावर भर देण्यात येत असुन शेतमालाच्या विक्रीसाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांचं बाजारभावातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहे, ही चांगली बाब आहे, त्यामुळे राज्य शासनाने कृषि योजनेमध्ये महिलांना 30 टक्के राखीव ठेवण्यात आले असुन यामुळे महिलांचे नाव सात बारावर घेणे आवश्यक होईल.
दीक्षांत भाषणात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी म्हणाले की, केवळ तंत्रज्ञानच शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक संपन्नता प्रदान करू शकतील. देशातील कृषी क्रांती ही संशोधनाच्या माध्यमातुन कृषि तंत्रज्ञान आधारित झाली असुन कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. एकीकडे, हरितक्रांतीचे फायदे कमी होतांना शाश्वत शेती करिता आपल्यासमोर असंख्य आव्हाने आहेत. हवामान बदल या पर्यावरणीय समस्यांनी जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरडवाहू क्षेत्रात अजुनही हरितक्रांतीची गरज आहे. अन्न सुरक्षसोबतच पोषण सुरक्षा यावर भर दयावा लागले. डॉ. ढवण यांच्या नेतृत्वात विद्यापीठाने पीक वाढीसाठी डिजिटल शेती संशोधन, जैवसमृध्द बाजरी व ज्वारीचे वाण, व्यावसायिक जैव मिश्रण बायोमिक्स संशोधन आदी मध्ये आघाडी घेतली आहे. परभणी कृषि विद्यापीठातील मनुष्यबळाचे केवळ शिक्षणाच्या क्षेत्रातच नाही तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही फार मोठे योगदान राहिले आहे. विद्यापीठाचा इतिहास हा यशाने परिपूर्ण असा आहे, आता विद्यापीठातून बाहेर पडणा–या विद्यार्थ्यांनी या इतिहासाची पुनरावृत्ती करावी. हे विद्यापीठ या भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत सेवारत आहे. गेल्या ५० वर्षांमध्ये संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने मोठे योगदान दिले. विद्यापीठ संशोधनाने आधीच देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत.
आज देशाला खाद्यतेलाची तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असुन मराठवाडा विभागातील माती आणि हवामान पारंपारिक तेलवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे, त्यामुळे विद्यापीठाने तेलवर्गीय पिकांच्या नवीन संशोधित जातीं विकसित करण्यावर भर दयावा. हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत असुन भविष्यात आपणास अनेक आव्हानांना तोंड दयावे लागेल. पिकांतील अनुवांशिक सुधारणा, एकात्मिक शेती पध्दती, संतुलित नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि वेळेवर हस्तक्षेप या बाबींचा कृषि विषयक धोरणात्मक निर्णय घेतांना विचार करावा लागेल. बदलत्या हवामानास अनुकुल नवीन प्रजातींच्या जलद विकासासाठी आनुवंशिक परिवर्तन, जनुक संपादन, जनुकीयरित्या परावर्तीत प्रजाती विकसित तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल, याला सार्वजनिक स्वीकृतीची आवश्यकता आहे. उदयोन्मुख बाजाराच्या गरजांशी नव कृषि पदवीधरांना जुळवून घ्यावे लागेल. जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, उच्च तंत्रशुद्ध उत्पादने आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बौद्धिक संपदा यासंबंधित समस्यांसह विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अलीकडे झालेल्या प्रगतीसाठी स्वत:ला सुसज्ज ठेवावे लागेल. कृषि पदवीधर भविष्यातील शेतीची आशा आहात, असे ते म्हणाले.
स्वागतपर भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ स्थापनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असुन आज पर्यंत कृषि शिक्षणाच्या माध्यमातुन ४७३४५ पदवीधारक विद्यापीठाने निर्माण झाले आहेत, हे उच्च शिक्षित कुशल मनुष्यबळ विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. गेल्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात संशोधनाच्या आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांच्या सुमारे १४४ उन्नत वाण विकसित केले आहेत. शेती पध्दती, पिकनिहाय व पिकपध्दती निहाय व्यवस्थापन, पिकांवरील रोग आणि किडीपासून संरक्षण करण्याचे पुरक तंत्रज्ञान विकसित केले असुन सुमारे ८५० पेक्षा अधिक कृषि तंत्रज्ञान शिफारशी दिलेल्या आहेत. शेतीतील मजुरांचे काबाडकष्ट कमी करणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ३५ पेक्षा जास्त यंत्रे व औजारे विकसित केलेली आहेत. आज सोयाबीन व तुर पिकांचे विद्यापीठाने केलेले वाणे मोठया प्रमाणात शेतकरी बाधवामध्ये प्रचलित आहेत.
मा ना श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी अनुग्रहीत करण्यात आले. समारंभात मा ना श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कृषि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ डि के पाटील व डॉ गिते (२०१७–१८), डॉ एम के घोडके (२०१८–१९), डॉ के टी आपेट व डॉ सी व्ही अंबडकर (२०१९–२०) यांना राधाकिशन शांती मल्होत्रा पोरितोषिकाने गौरविण्यात आले. दीक्षांत समारंभात २०१७–१८, २०१८–१९ व २०१९–२० वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण १०,९९७ स्नातकांना विविध पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीने माननीय प्रतिकुलपती व्दारा अनुग्रहीत करण्यात आले. विविध विद्याशाखेतील ९९२२ स्नातकांना पदवी, ९७८ स्नातकांना पदव्युत्तर तर ९७ स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्यात आले. समारंभात विविध अभ्यासक्रमातील विद्यापीठाने व दात्यांनी ठेवलेली सुवर्ण पदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे व डॉ विणा भालेराव यांनी केले. कार्यक्रमास विव्दत परिषदेचे माननीय सदस्य, शहरातील प्रतिष्ठीत नागरीक, विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कृषि संशोधनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शास्त्रज्ञ डॉ डि के पाटील व डॉ गिते यांना २०१७–१८ वर्षातील राधाकिशन शांती मल्होत्रा पोरितोषिकाने गौरविण्यात आले.