मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे नियोजन

पुणे दि.18- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून ग्रामीण भागात मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येतील, असे प्रतिपादन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आयोजित पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मिलींद शंभरकर, उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, साताराचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पुण्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, सोलापूरच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, साताराच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे आदी उपस्थित होते.

श्री.देशपांडे म्हणाले, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभेचे नियोजन करावे. नवमतदार आणि गावात नुकतेच विवाह होऊन आलेल्या महिलांची शिबिराच्या माध्यमातून मतदार यादीत नोंदणी करण्यात यावी. मतदार यादीत दिव्यांग मतदारांची नोंद घेण्यात यावी. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 13 व 14 नोव्हेंबर तसेच  27 आणि 28 नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्र, मोठी महाविद्यालये, औद्यागिक क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून मोहिमेस व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. मतदार यादीत आपले नाव तपासण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात यावे. राजकीय पक्षांची बैठक, लोकशाही गप्पा आदी उपक्रम राबवून संपूर्ण प्रकीयेची माहिती देण्यात यावी. 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी अधिकाधिक निर्दोष राहील याची दक्षता घ्यावी. शहरी भागातील मतदाराचे नाव निवासस्थानाजवळ असलेल्या मतदान केंद्राच्या यादीत असेल यासाठी विशेष प्रयत्न करावे. विशेष मोहिमेदरम्यान आलेले दावे व हरकतींबाबत त्वरीत प्रक्रीया सुरू करावी. मतदान केंद्र स्तरावरील चांगल्या उपक्रमांची देवाणघेवाण करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

मतदार यादी ‍निर्दोष करण्याबाबत वर्षभरात पुणे जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख आणि या प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

निवडणूकीशी संबंधित कामे करणे शासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बंधनकार असून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने आणि परस्पर सहकार्याने मोहिम राबवावी, असे श्री.राव यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख, श्री.शंभरकर आणि अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे मतदार यादी शुद्धीकरणाबाबत जिल्ह्यात झालेल्या कामाची आणि राबविण्यात आलेल्या मतदार जागृती उपक्रमांची माहिती दिली. महिला मतदार नोंदणीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले. तर वाहन परवान्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या युवकांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती श्री.शंभरकर यांनी दिली. मतदार छायाचित्र ओळखपत्र पोस्टाद्वारे वितरीत करण्यास लवकरच सुरूवात करण्यात येणार असून त्याची माहिती कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात येईल, असे श्री.वळवी यांनी सांगितले.

बैठकीस पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी, सह मतदार नोंदणी अधिकारी आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर उपस्थित होते.