कृषी हवामान सल्ला : दि. १५ ते २० ऑक्टोबर २१

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून मळणी करावी. मळणी केलेले सोयाबीन पावसाची उघाड बघून उन्हात वाळवूनच साठवणूक करावी.जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करून कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करून कोरडवाहू करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. बागायती करडई पिकाची पेरणी 5 नोव्हेंबर पर्यंत करता येते.जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करून कोरडवाहू रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करता येते.जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करून रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी बागेत जमिनीत वापसा येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे.  नविन लागवड केलेल्या डाळींब बागेत जमिनीत वापसा येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे.  नविन लागवड केलेल्या चिकू बागेत जमिनीत वापसा येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे.

 भाजीपाला

रब्बी हंगामात भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्यावर बियाणे टाकून रोपे तयार करावीत.

चारा पिके

रब्बी हंगामात चारा पिकांच्या लागवडीसाठी जमिनीत वापसा येताच पूर्व मशागतीची कामे करावी.

तुती रेशीम उद्योग

पावसाळयात पाणथळ जमिनीत किंवा खोल जमिनीत तुती लागवडीत पाणी साठून राहता कामा नये असे झाल्यास आर्द्रता वाढल्यामूळे पानावर बुरशिजन्य रोगाचा (भूरी) प्रादूर्भाव होतो व पानाची प्रत खराब होते रेशीम कीटकास रोग प्रादूर्भाव होण्याची दाट शक्यता असते त्यामूळे पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

सामुदायिक विज्ञान

एकापेक्षा जास्त कार्यासाठी वापरले जाणारे फर्निचर उचलण्यासाठी तसेच एका जागेवरून दूसऱ्या जागी नेण्यास आरामदायक असावे.

  (सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)