कृषिहवामान सल्ला; मराठवाडयात कमाल तापमान वाढणार

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 17 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

रब्बी पिकांच्या लागवडीसाठी जमिनीत वापसा येताच पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी.वेळेवर लागवड केलेल्या व वेचणीस तयार असलेल्या बागायती कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. कापूस पिकात सध्या अंतरीक बोंड सड व बाह्य बोंड सड याचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. अंतरीक बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 25 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी तसेच बाह्य बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 25 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारणी करावी.तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी वापसा येताच लवकरात लवकर मेटालॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी  25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावर फवारणी करावी.  तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  जमिनीत वापसा येताच काढणीस तयार असलेल्या भूईमूग पिकाची काढणी करावी.काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करावी.

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या केळी बागेत जमिनीत वापसा येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करून  प्रति झाड 50 ग्रॅम नत्र खत मात्रा द्यावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह फवारणी करावी.  नविन लागवड केलेल्या आंबा बागेत जमिनीत वापसा येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे.  द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करणऱ्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर छाटणीचे नियोजन करावे. काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

जमिनीत वापसा येताच भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.

फुलशेती

सध्या नवरात्र व पूढे येणाऱ्या दसरा उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

पशुधन व्यवस्थापन

अतिवृष्टीमूळे गवताद्वारे होणारे कृमीजन्य आजार यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच तळयाकाठी व गवतावरून गोगलगायजन्य आजार यांचे प्रमाण वाढते आहे. म्हणून शेळी-मेंढीमध्ये जंतनाशक औषधीची मात्रा तर करडे, कोकरे, लहान वासरे यांना रक्ती हगवण या आजारावरील औषधे पशूवैद्यक तज्ञांच्या मार्गदर्शनानूसार द्यावे. तद्वतच साचलेले पाणी पशूधन पिणार नाही याची काळजी घ्यावी. अशा पाण्याच्या स्त्रोताभोवती कुंपण करून घ्यावे व शूध्द पाणी पशूधनास द्यावे.

सामुदासिक विज्ञान

घराच्या आसपास मोठी झाडे किंवा उंच इमारती नसाव्यात. जेणेकरून घरामध्ये ताजी हवा व सूर्यप्रकाश येण्यास अडथळा निर्माण होणार नाही.

(सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)