औरंगाबाद, दि.12, :- पर्यावरणपूरक आणि शाश्वत औद्योगिक प्रगतीसाठी महाराष्ट्र शासनाने नेहमीच पुढाकार घेतला असून उपयुक्त आणि लोकाभिमूख प्रकल्पाच्या माध्यमातून ‘गो ग्रीन’ प्रकल्प शासन राबवित आहे. औरंगाबादचा औद्योगिक विकास हा आता पर्यावरणपूरक पध्दतीने होत असून अनेक कंपन्यांच्या माध्यमातून शाश्वत विकास पूरक उद्योग उभारले जात आहेत. एन्ड्रस ॲण्ड हाऊजर फ्लोटेक (इंडिया) प्रा.लि. चा ई-बस उद्घाटन समारंभ आज उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव बलदेव सिंह यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी स्विर्त्झलँडचे कॉन्सुल जनरल ओथमार हर्डेगर, एन्ड्रस ॲण्ड हाऊजर फ्लोटेक (इंडिया) प्रा.लि. चे अध्यक्ष आणि संचालक कुलाथू कुमार, महानगर पालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, इतर मान्यवर तसेच वरिष्ठ व्यवस्थापन टीम सहभागी झाली होती. तसेच एन्ड्रस ॲण्ड हाऊजर ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ॲड्रियास मेयर, डॉ.मिर्को लेहमन, तसेच स्विर्त्झलँडमधील वरिष्ठ नेतृत्व टीम, कॅम्पसमधील सर्व कर्मचारी या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.
बलदेव सिंह म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ च्या माध्यमातून देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांनी महाराष्ट्रात आणि औरंगाबादमध्ये गुंतवणूक केली आहे. औरंगाबादच्या औद्योगिक विकासामध्ये ऑरिक सिटी, डीएमआयसी तसेच महाराष्ट्र औद्योगिकविकास महामंडळ याच्या माध्यमातून शासन विविध सुविधा उद्योजकांना गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. यामुळे उद्योजक देखील गुंतवणुक करण्यास उत्सुक आहेत. ऑरिक सिटी, डीएमआयसी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत औरंगाबाद उद्योगात ईको फ्रेंडली, गो-ग्रीन तसेच स्मार्ट सिटीच्या उपक्रमातून उद्योगा बरोबरच पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम उद्योग विभाग करत असल्याचे प्रतिपादन बलदेव सिंह यांनी केले.
हवेची गुणवत्ता आणि पर्यावरण पूरक बसेसला प्रोत्साहन देण्यासाठी एन्ड्रस ॲण्ड हाऊजर पुढाकार घेत असून पर्यावरणपूरक हरित सृष्टीसाठी योग्य अशी बससेवा कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी सुरू केली असून या नविन उपक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात नवे पाऊल उचलल्याचे मनोगत एन्ड्रस ॲण्ड हाऊजर फ्लोटेक (इंडिया) प्रा.लि. चे अध्यक्ष आणि संचालक कुलाथू कुमार म्हणाले.