स्वामित्व योजना हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावांमध्ये विकास आणि विश्वास वृद्धिंगत करण्याचा एक नवीन मंत्र आहे
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी या योजनेअंतर्गत 1,71,000 लाभार्थ्यांना ई मालमत्ता पत्रांचे वाटप केले. केंद्रीय मंत्री, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार, लाभार्थी, गाव, जिल्हा आणि राज्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हंडिया, हरदाचे श्री पवन यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी मालमत्ता पत्र प्राप्त झाल्यावर त्यांना त्यांचा अनुभव विचारला. श्री पवन यांनी माहिती दिली की या पत्राद्वारे ते 2 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज घेऊन एक दुकान भाड्याने घेऊ शकले आणि कर्जाची परतफेड करायला देखील त्यांनी सुरवात केली आहे. पंतप्रधानांनी त्यांना अधिकाधिक डिजिटल व्यवहार करण्यास सांगितले. गावामध्ये सर्वेक्षण करत असलेल्या ड्रोनबाबत गावाच्या अनुभवावरही श्री मोदींनी चर्चा केली. श्री पवन म्हणाले की मालमत्ता पत्र मिळवण्यात त्यांना अडचण आली नाही आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन झाले. नागरिकांचे राहणीमान सुलभ करणे हे सरकारचे प्राधान्य आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
दिंडोरीचे श्री प्रेम सिंह यांना पीएम स्वामित्व योजनेद्वारे मालमत्ता पत्र प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षणासाठी लागलेल्या वेळेची माहिती घेतली. त्यांनी श्री प्रेम सिंह यांना मालमत्ता पत्र मिळाल्यानंतर त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले. श्री प्रेम म्हणाले की, आता त्यांचे घर पक्के बनवण्याची योजना आहे. त्यांना या योजनेची माहिती कशी मिळाली हे पंतप्रधानांनी जाणून घेतले. पंतप्रधानांनी स्वामित्व अभियानाद्वारे गरीब आणि वंचितांच्या मालमत्तेच्या हक्कांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले.
या योजनेद्वारे मालमत्ता पत्र प्राप्त झालेल्या श्रीमती विनीताबाई, बुधनी-सिहोर यांच्या योजनांची पंतप्रधानांनी चौकशी केली तेव्हा बँकेकडून कर्ज मिळवून दुकान उघडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी मालमत्तेबद्दल सुरक्षिततेची भावना व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले की, या योजनेमुळे न्यायालये आणि गावांमधील कामाचा ताण कमी होऊन देश प्रगती करेल. पंतप्रधानांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी सांगितले की, पीएम स्वामित्व योजनेच्या प्रारंभामुळे बँकांकडून कर्ज घेणे सोपे झाले आहे. मध्यप्रदेशाने ज्या वेगाने ही योजना लागू केली आहे त्याचे त्यांनी कौतुक केले. आज राज्यातील 3000 गावांमध्ये 1.70 लाख कुटुंबांना हे मालमत्ता पत्र मिळाले आहे. ते म्हणाले की हे इच्छापूर्ती पत्र त्यांच्यासाठी समृद्धीचे वाहन बनेल.
पंतप्रधान म्हणाले की जरी अनेकदा असे म्हटले जाते की भारताचा आत्मा खेड्यांमध्ये निवास करतो, मात्र स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनंतरही गावांची क्षमता कुंठित झाली होती. गावांची क्षमता, जमीन आणि लोकांच्या घरांचा त्यांच्या विकासासाठी पूर्णपणे उपयोग होऊ शकला नाही. उलट गावातील लोकांची ऊर्जा, वेळ आणि पैसा वादविवाद, भांडणे, गावातील जमिनी आणि घरांवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यात वाया गेला. महात्मा गांधी देखील या समस्येबद्दल कसे चिंतित होते याचे स्मरण पंतप्रधानांनी करून दिले आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुजरातमध्ये लागू करण्यात आलेल्या ‘समरस ग्रामपंचायत योजनेची’ आठवण करून दिली.
कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी गावांची प्रशंसा केली. भारताच्या गावांनी एकाच ध्येयाने एकत्रितपणे कसे काम केले आणि मोठ्या दक्षतेने महामारीचा कसा केला हे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की भारतातील गावे अलगीकरण व्यवस्था आणि बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी खाण्यापिण्याची आणि कामाची व्यवस्था यासारख्या खबरदारीमध्ये खूप पुढे आहेत आणि लसीकरणाचेही काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. पंतप्रधान म्हणाले की, कठीण काळात महामारीचा सामना करण्यासाठी गावांनी भूमिका बजावली.
पंतप्रधानांनी देशातील गावे, खेड्यांची मालमत्ता, जमीन आणि घरांच्या नोंदी अनिश्चितता आणि अविश्वासापासून मुक्त करण्याचे महत्त्व सांगितले. ते पुढे म्हणाले की, पीएम स्वामित्व योजना आमच्या गावातील बंधू -भगिनींची मोठी ताकद बनणार आहे.
पंतप्रधान म्हणाले की, स्वामित्व योजना ही केवळ मालमत्तेची कागदपत्रे देण्याची योजना नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने देशातील गावांमध्ये विकास आणि विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी हा एक नवीन मंत्र आहे. ते म्हणाले, “सर्वेक्षणासाठी गावांमध्ये आणि परिसरात उडणारे विमान (ड्रोन) भारतातील गावांना नवीन उंची देत आहे.”
पंतप्रधान म्हणाले की, गरीबांचे दुसऱ्यावरील अवलंबित्व दूर करण्याचा सरकारचा गेल्या 6-7 वर्षांपासून प्रयत्न आहे. आता, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकर्यांच्या बँक खात्यात शेतीच्या छोट्या गरजांसाठी थेट पैसे वर्ग केले जात आहेत, असे ते म्हणाले. श्री मोदी म्हणाले की, आता ते दिवस संपले आहेत जेव्हा गरीबांना प्रत्येक गोष्टीत सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागत होते. आता सरकार स्वतः गरीबांपर्यंत पोहचून त्यांना सक्षम बनवत आहे. त्यांनी कर्ज योजनेद्वारे लोकांना तारण न देता कर्ज उपलब्ध करून देण्याचे उदाहरण म्हणून मुद्रा योजनेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, गेल्या 6 वर्षांमध्ये लोकांसाठी सुमारे 15 लाख कोटी रुपयांची 29 कोटी कर्ज मंजूर करण्यात आली आहेत. ते म्हणाले की आज देशात 70 लाख बचत गट कार्यरत आहेत आणि महिला जनधन खात्यांद्वारे बँकिंग प्रणालीशी जोडल्या जात आहेत. त्यांनी बचत गटांना विना तारण कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्याच्या अलीकडील निर्णयाचाही उल्लेख केला. त्याचप्रमाणे, 25 लाखांहून अधिक पथविक्रेत्यांना स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज मिळाले आहे.
सरते शेवटी पंतप्रधानांनी सांगितले की, शेतकरी, रुग्ण आणि दुर्गम भागांना ड्रोन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. भारतात ड्रोन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी PLI योजना देखील घोषित करण्यात आली आहे जेणेकरून भारतात मोठ्या प्रमाणात आधुनिक ड्रोन तयार केले जातील आणि भारत या महत्त्वाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होईल. पंतप्रधानांनी शास्त्रज्ञ, अभियंते, सॉफ्टवेअर विकासक आणि स्टार्ट-अप उद्योजकांना भारतात कमी किमतीचे ड्रोन बनवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “ड्रोनमध्ये भारताला नवीन उंचीवर नेण्याची क्षमता आहे.”