देशात कोविडवरील लस वाहतुकीसाठी आता ड्रोनचा वापर; दुर्गम भागाला फायदा

जीव रक्षक औषधे पोहोचवण्यात आणि वैद्यकीय तातडीच्या प्रसंगी तसेच दुर्गम भागात रक्त नमुने संकलित करण्यासाठी ड्रोनचा वापर शक्य : मनसुख मांडवीय

देशातल्या अंतिम नागरिकासाठी  आरोग्य सुविधा शक्य करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेची प्रचीती देत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या ड्रोन रिस्पॉन्स अ‍ॅन्ड आउटरिच (आय – ड्रोन )चा  ईशान्येमध्ये प्रारंभ केला. जीव रक्षक लस प्रत्येकापर्यंत पोहोचेल याची सुनिश्चिती या  मॉडेलद्वारे होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे.आजचा दिवस ऐतिहासिक असून तंत्रज्ञानाने जीवन कसे सुलभ होत आहे आणि सामाजिक परिवर्तन कसे घडवत आहे याची साक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले.  मेक इन इंडिया अर्थात भारतात निर्मिती झालेल्या ड्रोनचा, दक्षिण आशियात प्रथमच कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या वाहतुकीसाठी झाला. मणिपूरमधल्या कारांग मधल्या बिश्नुपूर जिल्हा रुग्णालय ते लोकतक तलाव   हे 15 किमी हवाई अंतर 12-15 मिनिटात  पार झाले आहे. या ठिकाणामधले रस्ता मार्गे अंतर 26 किमी आहे.  आज 10 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 8 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.

भारत हा भौगोलिक विविधतेने नटलेला देश असून जीव रक्षक औषधे पोहोचवण्यासाठी, रक्त नमुने संकलित करण्यासाठी आपण ड्रोनचा वापर करू शकतो असे ते म्हणाले. तातडीच्या प्रसंगी या  तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकेल.आरोग्य क्षेत्रात विशेषतः दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे आव्हान पार करण्यामध्ये हे तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावेल असे मांडवीय यांनी सांगितले.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रभावी आणि सुरक्षित लस व्यवस्थापन असूनही भारताच्या दुर्गम भागात लस पोहोचवणे आव्हानात्मक ठरत होते. या आव्हानावर मात करण्यासाठी या आय ड्रोनची रचना करण्यात आली आहे. सध्या मणिपूर, नागालॅन्ड आणि अंदमान निकोबार साठी या ड्रोन आधारित प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.

लस सुरक्षित नेण्यासाठी ड्रोनच्या क्षमतेची चाचणी करण्यासाठी आयसीएमआरने, कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने प्रारंभिक अभ्यास केला आहे.

कार्यक्रमाचे वेबकास्ट इथे आहे :