सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मालवाहतूक यांच्या इंधन स्रोतात बदल करून 100% हरित आणि स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा वापर करण्यासाठी सरकार कटिबद्ध : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मालवाहतूक यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या इंधन स्रोतात बदल घडवून आणून या वाहनांसाठी 100% हरित आणि स्वच्छ उर्जा स्रोत वापरण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आंतरराष्ट्रीय वाहन तंत्रज्ञान विषयावरील परिसंवादात बोलताना ते म्हणाले की,पंतप्रधानांनी सुरु केलेले राष्ट्रीय हायड्रोजन अभियान, वाहतूक क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यातून हरित-हायड्रोजन निर्मिती आणि वापर क्षेत्रात भारताला आघाडीचा देश म्हणून स्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, हरित हायड्रोजन उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चाच्या 70% खर्च विजेचा असतो. म्हणून, पुनर्नविकरणीय उर्जा स्रोतांपासून मिळणारी अधिकची वीज हरित हायड्रोजन उत्पादनाचे अर्थशास्त्र संपूर्णपणे बदलून टाकू शकते. ते म्हणाले की हरित हायड्रोजनला भविष्यातील इंधन असे नाव देण्यात आले असून “शून्य कार्बन उत्सर्जन” अभियानाला यश मिळण्यासाठी उपयुक्त ठरणारे ते एकमेव इंधन आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांच्या सोहळ्याची सुरुवात करणारे हे वर्ष असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होण्यावर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपले स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की नुकतीच सुरु करण्यात आलेली उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रात जीवाश्म इंधन उत्सर्जन कमी करण्याला मदत करणाऱ्या ‘आधुनिक वाहतूक तंत्रज्ञान उत्पादनांना’ चालना देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली. ही योजना 42,500 कोटी रुपयांहून अधिकच्या नव्या गुंतवणुकीला चालना देईल आणि वाहन निर्मिती क्षेत्रात 7.5 लाख अतिरिक्त रोजगार निर्मिती करेल अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करता, भारतातील जनतेसाठी, आयात केलेल्या वाहनांना पर्यायी ठरतील अशा, किफायतशीर आणि स्वदेशी बनावटीच्या वाहतूक पर्यायांचा शोध घेणे आणि आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करणे ही आजच्या घडीची गरज आहे असे गडकरी म्हणाले.
पूर्णपणे इथेनॉलवर आणि पूर्णपणे पेट्रोलवर अशा दोन्ही प्रकारे चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल अर्थात इंधन वापराबाबत लवचिकता असणाऱ्या वाहनांना वापरात आणण्याचे नियोजन आम्ही करत आहोत असे सांगून ते म्हणाले की फ्लेक्स इंजिनावर आधारित वाहने याधीच अमेरिका, ब्राझील आणि कॅनडा या देशांमध्ये वापरली जात आहेत. यासाठीचे तंत्रज्ञान सहज उपलब्ध असून आता देशाचे वाहतुकविषयक चित्र संपूर्णपणे पालटून टाकणारी झेप घेण्यासाठी फक्त काही काळाचा अवधी आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले की, भारतात दर वर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात घडतात आणि त्यात सुमारे दीड लाख व्यक्तींना जीव गमवावा लागतो म्हणून भारतीय रस्त्यांची सुरक्षाविषयक परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. युरोपातील देशांप्रमाणे भारतात शून्य अपघात आणि शून्य जीवितहानी साध्य करणारी झिरो व्हिजन ही संकल्पना भारतात देखील स्वीकारली जात आहे.