कृषी पर्यटन सुरू करण्यापूर्वी या शेताला भेट द्या

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका डोंगर-दर्‍याने व्यापलेला आहे. याच तालुक्यात नेरळ रेल्वेस्टेशनजवळ सह्याद्री पर्वत रांगांनी वेढलेले मालेगाव नावाचे एक छोटे खेडे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात उदरनिर्वाहासाठी कोकणातून स्थलांतर केलेले भडसावळे कुटुंब याच गावात स्थायिक झाले आहे. स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगलेले कुटुंब अशी या कुटुंबाची ओळख आहे. जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातील चंद्रशेखर भडसावळे सत्तरीच्या दशकात अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरात अन्नप्रक्रियेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेले होते. शिक्षण पूर्ण करत असताना भडसावळे तेथेच नोकरी करत होते. भारतीय लोक अमेरिकेत शिक्षणासाठी येतात व येथेच स्थायिक होतात! या आशयाची चेष्टा भडसावळेंच्या एका गोर्‍या मित्राने केली, भारतावर प्रेम असलेल्या भडसावळेंना त्यांच्या मित्राची चेष्टा सहन झाली नाही. भडसावळे लागलीच त्यांच्या मालेगावात परतले. उच्चभ्रू पाश्‍चिमात्य जीवनशैलीचा अनुभव घेतलेल्या भडसावळे यांनी शेती करायला सुरुवात केली. शेती करत असताना त्यांना भेटणार्‍या लोकांच्या माध्यमातून ‘सगुणा बाग’ नावाचे कृषी पर्यटन केंद्र मालेगाव नावाच्या छोट्या खेड्यात सुरू झाले आहे. दिवसाला २०० ते ३०० पर्यटक त्यांच्या पर्यटन केंद्रावर भेट देत असतात. पॉंड हाऊस, बङ्गेलो रायडिंग, स्नेक शो, शिवार ङ्गेरी, भात पर्यटन, मत्स्य पर्यटन यासारख्या नव्या संकल्पना त्यांनी सगुणा बागेतील कृषी पर्यटन केंद्रात राबविल्या आहेत.

सन १९९३ पासून त्यांनी व्यावसायिक कृषिपर्यटन सुरू केले. त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा भडसावळे एम. एस्सी झाल्या आहेत. बागेत विविध प्रकारची झाडे लावून त्यांची शास्त्रीय माहितीचे ङ्गलक निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या दाम्पत्याचे चिरंजीव आनंद यांनी स्वित्झर्लंड येथून कृषी पर्यटन केंद्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे भडसावळेंची दुसरी पिढी देखील आता हाच व्यवसाय पुढे नेत आहे. आनंदरावांनी स्वित्झर्लंड येथे घेतलेल्या शिक्षणाचे प्रतिबिंब सगुणा बागेत पाहायला मिळते. पर्यटकांना कचरा डब्यातच टाकावा लागेल, असे डस्टबीन त्यांनी सगुणा बागेत बसवले आहेत. सध्या सगुणा बागेत विविध स्तरांवर ७० कर्मचारी काम करत आहेत. सगुणा बागेतील शेतमाल याच ठिकाणी विकला जातो. त्यामुळे शेतमालाला देखील शाश्‍वत बाजारपेठ निर्माण झाली आहे. कृषी पर्यटन हा शेतीचा जोडधंदा म्हणून कात टाकतो आहे. कृषी पर्यटनाचा अवलंब वाढला तर शेतकर्‍याला प्रतिष्ठा मिळेल, असे भडसावळे नेहमी सांगत असतात.

अनोळखी व्यक्तीचा पाहूणचार करता येणे हा कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठीचा महत्त्वाचा गुण आहे. भारतीय संस्कृतीत अथिती देवो भव या संकल्पनेला मोठे स्थान आहे. या संकल्पनेचा अवलंब केल्यास हा व्यवसाय यशस्वी होईलच, असे भडसावळे ठामपणे सांगतात. सगुणा बागेत येणारे पर्यटक हे प्रामुख्याने शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबांतील असतात. बागेत येणारा पर्यटक हा कृषी क्षेत्राचे ज्ञान घेऊन जात असतो. त्यामुळे कृषी साक्षरता वाढवण्यासाठी पर्यटन केंद्रांची मदत होत असते.

आपल्या शेतीचा व्यवसाय पर्यटनाच्या दृष्टीने करायचा या उद्देशाने सगुणा बागेत तळ्यामध्ये पॉंड हाऊसची निर्मिती भडसावळेंनी केली आहे. शहरी पर्यटकांना ग्रामजीवनाचा अनुभव स्थानिक पातळीवर करता यावा, या उद्देशाने त्यांनी पॉंड हाऊसची निर्मिती केली आहे. या ‘पॉंड हाऊस’ मध्ये वास्तव्यासाठी एक हजार रुपये पर्यटकांना द्यावे लागतात. विशेष म्हणजे या तळ्याचा उपयोग मत्स्यपालनासाठी ते करतात.

नेरळ, मालेगाव परिसरातील भात हे महत्त्वाचे पीक आहे. त्यांनी बहुतांश क्षेत्रावर वुसा सुगंधी या भाताची लागवड केली आहे. या लागवडीबरोबरच त्यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘मणिपुरी भोग’ या भात पिकाची लागवड केली आहे. या भाताचा रंग लालसर असतो. या भाताचा उपयोग खिरीसाठी केला जातो. निळसर रंगाची दिसणारी खीर पौष्टिक असते. मणीपूर परिसरातून हे भात पीक नाहीसे होत चालले आहे. भडसावळेंनी यशस्वी लागवड केल्याने सगुणा बागेत मणिपूर येथून शास्त्रज्ञ सातत्याने भेट देत आहेत. या प्रकारचा यशस्वी प्रयोग भडसावळेंनी केल्याने परिसरात या प्रकारच्या भाताची लागवड करता येणे शक्य आहे. भात शेतीवर किटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव होत असतो, त्यामुळे किटकांना आकर्षित करण्यासाठी शेताजवळ मोठा दिवा लावण्यात आला आहे. हा दिव्यासाठी छोटे घर केले आहे. दिव्याखाली एका पात्रात पाणी ठेवले आहे. या पाण्यात किटक पडतात, हे पाहण्यासाठी पर्यटक देखील आकर्षित होतात, किटकांपासून पिकांचे संरक्षण देखील होते.

गावातील तळ्यात म्हशी डुंबल्यावर त्यावर बसणारा पशुपालक हे चित्र सातत्याने दिसते; परंतु शहरी पर्यटकांना या गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळे शहरी पर्यटकांसाठी सगुणा बागेत बङ्गेलो रायडिंगची सोय करण्यात आली आहे. राजा नावाच्या मावळी रेड्याचा वापर त्यासाठी केला जातो. पर्यटकांना रेड्यावर बसवण्यासाठी प्रशिक्षित युवकाची नेमणूक करण्यात आली आहे.

स्थानिक युवकांना सगुणा बागेमुळे रोजगार निर्माण झाला आहे. पर्यटकांना माहिती देणारा माझा कर्मचारी हा  सगुणा कृषी विद्यापीठातील प्राध्यापक असल्याने भडसावळे अभिमानाने सांगत असतात. बुद्धाज बेली, कोकम यासारख्या विविध वनस्पतींची लागवड या परिसरात केली आहे. विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची शास्त्रीय माहिती शिवार ङ्गेरीतून होत असल्याने पर्यटकांच्या ज्ञानात देखील भर पडत आहे.

सगुणा बागेत विविध प्रकारची तळी आहेत. या तळ्यांमध्ये मासे सोडण्यात आले आहेत. येणार्‍या पर्यटकांना जिवंत मासे पकडून दाखवले जातात. त्याचा आस्वाद देखील पर्यटकांना घेता येतो. बोहरा समाजातील लोकांना कटला मासा ङ्गार आवडतो. रमजाननंतर बोहरा समाजाचे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे भडसावळेंनी मोठ्या प्रमाणात कटला मत्स्यबीज तळ्यात सोडले आहे. पर्यटकांना पोहण्याची सोय देखील या ठिकाणी उपलब्ध केली आहे.

शिवार ङ्गेरी व दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर संध्याकाळी स्थानिक सापांची माहिती देणारा ‘स्नेक शो’ भडसावळे करत असतात. पर्यटकांना सगुणा बाग परिसरात नेहमी आनंदी राहता यावे, या उद्देशाने या शोचे आयोजन करण्यात येते.

निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी शहरी पर्यटक सगुणा बागेत मुक्काम देखील करत असतात. यासाठी त्यांना ग्रामीण वातावरणाचा अनभुव देण्यासाठी कौलारू घरांची निर्मिती केली आहे. या घरांमध्ये राहण्यासाठी दोनशे ते चारशे रुपयांपर्यंतचे दर आहेत.

बागेतील गोठ्यातील जनावरे ही बहुतांश देशी प्रकारातील आहेत. मावळी, खिलार या प्रकारात या गाई, म्हशी आहेत. गोठ्याच्या बाहेरच गोबर गॅसचा अद्यायावत प्लँट बसवण्यात आला आहे. या गॅसद्वारे बागेतील इंधनाची सोय होते.

बागेतील कर्मचारी कोणत्याही प्रकारचे काम करायला तयार असतो, हे या बागेचे वेगळेपण आहे. गाईड करणारी व्यक्ती पर्यटकांना जेवण वाढत असते, तर जेवण वाढणारी व्यक्ती त्याचे काम झाल्यानंतर पर्यटकांना सोडवण्याची देखील तयारी करत असते. येथील कर्मचार्‍यांना ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत पगार आहेत. वीस वर्षांतील भडसावळेंचे प्रयत्न या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत.

संपर्क-
चंद्रशेखर भडसावळे,
सगुणा बाग, नेरळ
फोन : ०२१४८-२३८४३८/२३८३३८/६५०३४९