भिलदरी (कन्नड, औरंगाबाद) पाझर तलावांच्या दुरुस्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण

मुंबई, दि. १६ : भिलदरी पाझर तलाव क्र. १, ता. कन्नड, जि. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तलावाची तुटफ़ुटची मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत दुरुस्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या तत्परतेमुळे १५ दिवसांच्या आत दुरुस्तीच्या ४ कोटी ९५ लक्ष ३८ हजार ७०० रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

याबरोबरच मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत भिलदरी पाझर तलाव क्र. २, ता. कन्नड, जि. औरंगाबाद योजनेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावास रु. ५८,०६,८००/- (अक्षरी रुपये अठ्ठावन्न लक्ष सहा हजार आठशे फक्त) आणि भिलदरी पाझर तलाव क्र. ४, ता. कन्नड, जि. औरंगाबाद योजनेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावास रु. २५,८८,२००/- (अक्षरी रुपये पंचवीस लक्ष अठ्याऐंशी हजार दोनशे फक्त) या किंमतीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तलावांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे तलावाच्या दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असल्याने मंत्री श्री.गडाख यांनी विशेष लक्ष देऊन अती तातडीने १५ दिवसांच्या आत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

भिलदरी पाझर तलावांच्या साठवण क्षमतेत मोठी वाढ होणार असून सिंचन क्षेत्रातील परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याची श्री.गडाख यांनी यावेळी सांगितले.

श्री.गडाख म्हणाले, कामाची गुणवत्ता उत्तम दर्जाची राहील याची जबाबदारी जलसंधारण अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येक कामाची उलट तपासणी करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामांचा दोष दायित्व कालावधी पाच वर्षाचा राहणार आहे. प्रत्येक कामाचे जीओटॅग व व्हिडीओ चित्रीकरण बंधनकारक करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

(छायाचित्र प्रतीकात्मक )