भारत आणि युके यांच्यामध्ये FTA म्हणजेच मुक्त व्यापार करारावर नोव्हेंबर 2021 पर्यंत वाटाघाटी सुरु होतील. अंतरिम कराराचा मसूदा दोन्ही देशांच्या प्राधान्यक्रमावर असेल आणि त्यानंतर सर्वसमावेशक करार होईल. मुक्त व्यापार करार आणि इतर व्यापारासंबधी भारताचे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि त्यांच्या ब्रिटीश समपदस्थ सेक्रेटरी ऑफ स्टेट एलिझाबेथ ट्रुस यांच्यामधील चर्चेत या विषयावरही चर्चा झाली.
भारत आणि युके मधील प्रस्तावित मुक्त व्यापार करार अनेक विशेष व्यापार संधी खुल्या करेल तसेच यामुळे अनेक रोजगार निर्माण होतील. दोन्ही देशांना उपयुक्त ठरेल अश्या प्रकारे व्यापाराला चालना देण्यासंदर्भात आपली कटीबद्धता दोन्ही बाजूंकडून यावेळी नव्याने अधोरेखित झाली.
या मुक्त व्यापार करारासंबधी दोन्ही देशातील उद्योगक्षेत्रात प्रचंड उत्सुकता आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहकव्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी 4 मे 2021 रोजी व्यापक व्यापार भागीदारीची घोषणा केल्यानंतर भारत आणि युके या दोन्ही देशांनी भागीदारीच्या अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे.
दोन्ही बाजूंच्या व्यापाराला त्वरीत आर्थिक लाभ होण्याच्या दृष्टीने या वाटाघाटी लवकर निष्कर्षाप्रत आणण्यावर भर असेल असेही मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले. माल तसेच सेवा यांत बांधिलकी व सवलती यामध्ये समतोल राखण्याची गरज पीयूष गोयल यांनी यावेळी विशद केली.