केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी बैठक
केंद्रीय कृषी, आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी 25 जुलै 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यामध्ये मध्यप्रदेशच्या कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ, ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विश्व विद्यालयाचे कुलगुरू, आणि अन्य भागधारक सहभागी झाले होते.
ग्वाल्हेर-चंबळ प्रांतातील मोठा डोंगराळ भाग कृषी क्षेत्राखाली आणण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. हा महत्त्वाचा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहयोग आणि पाठिंब्याने पूर्ण करण्यात येईल, असे या बैठकीदरम्यान ठरविण्यात आले. या संदर्भात यापूर्वी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसमवेत बैठकही घेण्यात आली असून, एका महिन्यात प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री यांनी सांगितले की, तीन लाख हेक्टर पेक्षा जास्त खडबडीत असलेली जमीन शेतीयोग्य नाही आणि जर क्षेत्रामध्ये सुधारणा झाली तर यामुळे ग्वाल्हेर-चंबळ प्रांतातील डोंगराळ परिसराचा एकात्मिक विकास होण्यास मदत होऊ शकेल. त्यांनी पुढे नमूद केले की, या प्रकल्पातील प्रस्तावित सुधारणेमुळे केवळ शेतीचा विकास आणि पर्यावरण सुधारण्यास मदत होणार नाही तर स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील आणि या क्षेत्राचा भरीव विकास होईल.
तोमर म्हणाले की ग्वाल्हेर-चंबळ प्रांतातील डोंगराळ क्षेत्राचा विकास करण्यासाठी मोठी संधी आहे. चंबळ द्रुतगतीमार्ग बांधला जाईल आणि याच परिसरातून तो जाईल, ज्यामुळे या प्रदेशाचा सर्वांगिण विकास होणे शक्य होईल. प्राथमिक अहवाल तयार केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह त्यानंतरच्या बैठका घेतल्या जातील.