दीपक श्रीवास्तव : निफाड
अंदरसुल तालुका येवला येथील टोमॅटो उत्पादक आदित्य जाधव दिवसभर उपाशीतापाशी राहून व प्रचंड मेहनत करून वाहतुकीसाठी गाडीचा खर्च करून टोमॅटो येवला येथे विक्रीसाठी आणले होते परंतु टोमॅटोला भाव मिळाला नसल्याने उद्ध्वस्त होऊन शेवटी त्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले, तेव्हा त्याच्या डोळ्यात उद्विग्नतेचे पाणी होते. भर बाजारात या शेतकऱ्यावर हतबल होण्याची वेळ आली.
ही परिस्थिती जवळपास सर्वच शेतकऱ्यांची आहे.
भाव पडल्यामुळे मोठी भयंकर परिस्थिती आहे संपूर्ण शेती उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असून शेतकरी जगेल कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेअर मार्केटचे निर्देशांक दोन तीनशे पॉईंट ने खाली आले तर देशाचे अर्थमंत्री रिझर्व बँकेचे चेअरमन संपूर्ण मीडिया काळजी करू लागतो. किती प्रचंड नुकसान झाल्याचे आकडे सांगितले जातात. आज या भाजीपाल्याचे भाव क्रॅश झाल्यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटींचा फटका बसलेला आहे.
हे नुकसान एका दिवसाचे नसून पूर्ण वर्षभराचे नुकसान आहे कारण शेतकऱ्यांना ही वेळ परत आणता येत नाही वर्षभराच्या मेहनतीनंतर आणि प्रचंड भांडवली खर्च करून पीकच नव्हे तर स्वप्ने फुलवलेली असतात , पिकांबरोबरच शेतकऱ्यांची स्वप्न देखील मोडून पडतात मुलाबाळांची लग्ने शिक्षण आजारपण रोजचा खर्च हे सर्व कोठून काढायचे हा सर्व विचार केला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याचे मूळ कारण लक्षात येते.
असा आहे जमा खर्च टोमॅटोचा; सारा व्यवहार आतबट्ट्याचा
1 एकर जमिनीत टोमॅटो उत्पादनासाठी येणारा ढोबळ खर्च
जमीन मशागत 4000
रोपे खरेदी 10000
खते व औषधे 25000
मल्चिंग पेपर 15000
तार बांबू 20000
लागवड मजुरी 5000
तोडणी मजुरी 20000
(20 रुपये प्रमाणे 1000 क्रेट साठी)
वाहतूक खर्च 20000
(20 रुपये प्रमाणे 1000 क्रेट साठी)
मार्केट फी, आडत, दलाली, हमाली व इतर किरकोळ खर्च सुमारे 5000
एकूण खर्च एकरी रुपये 1,25,000
यामध्ये ठिबक सिंचनाचा खर्च, भांडवलावर व्याज , घरच्या माणसांनी केलेल्या कष्टाचे मोल व इतर किरकोळ खर्च यांचा समावेश केलेला नाही.
या बदल्यात मिळणारे उत्पन्न बघितले तर हे असे …
सरासरी 20 किलोचा एक क्रेट याप्रमाणे 1000 क्रेट म्हणजेच जवळपास 20 टन माल होतो.
सरासरी 10 रुपये किलो इतका भाव मिळाला तर 2 लाख रुपये हाती येऊ शकतात. आजच्या घडीला मात्र मार्केट क्रॅश झाल्यामुळे 2 ते 3 रुपये किलो दराने माल विक्री करावी लागत आहे.
याचाच अर्थ शेतकऱ्याच्या हाती आत्ताच्या घडीला 20 टन मालाचे फक्त 50 ते 60 हजार रुपये मिळणार आहेत प्रत्यक्षात होणारा खर्च हा त्याच्या तीन पटीने जास्त आहे.
टोमॅटो बरोबरच कारली, वांगी, भेंडी, मिरची, काकडी अशा सर्वच वेलवर्गीय पिकांची व भाजीपाल्याची दैना झालेली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वीच याबाबतीत जाहीरपणे सांगितले होते की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या किमान पन्नास टक्के रक्कम इतका तरी नफा मिळायलाच पाहिजे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी देखील सातत्याने उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे अशी सातत्याने मागणी केली होती. मात्र आज या साऱ्या हवेतल्या गप्पा ठरलेल्या असून शेतकऱ्यांपुढे जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकलेला आहे. शेअर मार्केटमधील निर्देशांक घसरले की सारीकडे चर्चा होते सरकारची धावपळ उडून तातडीने उपाय योजना केल्या जातात आज मात्र शेतकऱ्यांना लाखो कोटी रुपयांचा फटका बसून देखील कोणालाही त्याचे सोयरसुतक वाटत नाही.