मुंबई, दि. 25 : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकास करताना या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावी याकरिता या उद्यान परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यादृष्टीने सर्वसमावेशक आराखडा, संकल्पना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदिपानराव भुमरे यांचेसह मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, जलसंपदा विभागाचे सचिव कोहिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची दुरवस्था झाल्याने त्याचे नूतनीकरण करून हे उद्यान विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. हे उद्यान विकसित करताना जनतेच्या आशा, अपेक्षा जाणून घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्याशिवाय स्पर्धात्मक पद्धतीने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जनतेकडून उद्यान विकासाचे आराखडे मागविण्यात आले होते. औरंगाबादच्या एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आराखड्याचे तसेच वास्तुविशारद पी. के. दास यांनी तयार केलेल्या आराखड्याचे बैठकीत सादरीकरण करण्यात आले.
औरंगाबाद परिसरात टुरिझम सर्किट विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबरोबरच पैठणच्या नाथसागर परिसरात अधिकाधिक पर्यटकांनी यावे याकरिता आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. औरंगाबाद विमानतळाचे आंतरराष्ट्रीय विमानतळात रुपांतर केल्यास तशा सुविधा निर्माण केल्यास विदेशी पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.
संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासामुळे केवळ पैठणच्याच नव्हे तर संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल. पैठण हे तीर्थक्षेत्र आहेचा या उद्यानामुळे येथे येणाऱ्या पर्यटक, भाविकांसाठी आणखी चांगली सुविधा निर्माण होणार आहे, असे रोहयोमंत्री संदिपानराव भुमरे यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या संकल्पनांची छाननी प्रक्रिया १५ दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी यावेळी सांगितले.