महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुवतारा ढासळला
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांची प्राणज्योत आज वयाच्या ९५ व्या वर्षी मालवली. दीर्घ आजाराशी त्यांची झुंज आज अखेर संपली. सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती शेकापचे मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस अॅड. राजेंद्र कोरडे यांनी दिली आहे.
सर्वाधिक म्हणजेच तब्बल ११ वेळा एकाच पक्षाकडून निवडणूक जिंकणारे विक्रमवीर आमदार अशी गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. सांगोला तालुक्यात त्यांनी शेती, सहकार, पाणी, स्त्री सक्षमता यांबद्दल भरीव कामगिरी केली. अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या वैचारिक बैठकीशी ते एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने राज्यातील शेतकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुवतारा ढासळला, अशा भावना अॅड. राजेंद्र कोरडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले___ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील.