सातारा, दि.28 : पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा विस्कळीत झाला असल्याने तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता कामे पूर्ण होणे गरजेचे असून येत्या ७२ तासांत तालुक्यातील रस्ते पूल वाहतुकीसाठी खुले करा तसेच आपतग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची तातडीने उभारणी करा, अशा स्पष्ट सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या.
पाटण तालुक्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे झालेले नुकसान व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता खलाटे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता खैरमोडे, वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, कोयना धरण व्यवस्थापन कार्यकारी अभियंता पोतदार, लघुसिंचन जलसंधारण प्रभारी कार्यकारी अभियंता पवार, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सार्व.बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील, व्ही.डी.शिंदे तसेच विविध खात्याचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, पाटण तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलन यामुळे फार मोठी आपत्ती उद्भवली असल्याने तालुक्यातील रस्ते, पूल, विद्युत पुरवठा आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेले असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेकडो एकर शेतीचे, पिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. तर भूस्खलनामुळे तालुक्यातील आंबेघर, मिरगाव ढोकावळे या ठिकाणी घरच्या घरे जमिनीत गाडली गेल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. संपर्कहिन गावांचे तातडीने दळण-वळण सुरु होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, प्रधानमंत्री सडक योजना व जलसंपदा विभाग या सर्व विभागांनी समन्वयातून काम करुन संपर्कहिन गावांचे रस्ते, साकव पूल दुरुस्तीचे काम दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी समन्वयाने तातडीने कोयनानगर येथील वसाहतींची दुरुस्ती करुन बाधित कुटुंबियांना निवासाची व्यवस्था होण्याच्यादृष्टीने उपाययोजना करावी. विज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा बंद असलेल्या गावांना वीज पुरवठा करण्याचे काम पूर्ण करा, अशाही सूचना गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांनी या बैठकीत दिल्या.