कृषी सल्ला : मराठवाडयात पुढील पाच दिवसात तुरळक पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 01 ऑगस्ट ते 07 ऑगस्ट, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकाची लागवड करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राचा दूसरा हप्ता  दिला नसल्यास बागायतीसाठी 60 किलो नत्र प्रति हेक्टर व कोरडवाहूसाठी 36 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावा. कापूस पिकात आंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. मागील काळात झालेला पाऊस सध्याचे दमट व ढगाळ वातावरण यामुळे कापूस पिकात रसशोषक  किडींच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामिप्रीड 20% 30 ग्रॅम किंवा थायामिथॉक्झाम 25% 40 ग्रॅम  किंवा फलोनिकॅनिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. तूर पिकात आंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. मागील काळात झालेला पाऊस सध्याचे दमट व ढगाळ वातावरण यामुळे मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर फवारणी करावी. भुईमूग  पिकात तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर तीन ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या व एक खूरपणी करावी. लवकर पेणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड  केलेल्या केळी बागेतील तणांचे नियंत्रण करावे.नविन लागवड  केलेल्या आंबा बागेतील तणांचे नियंत्रण करावेद्राक्ष बागेत पानांची विरळणी व शेंडा खुडणी करावी. द्राक्ष बागेत केवडा रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस 4 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेत तणांचे नियंत्रण करावे.

 भाजीपाला

नविन लागवड केलेल्या भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे.  मागील काळात झालेला पाऊस सध्याचे दमट व ढगाळ वातावरण यामुळे टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॉबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

नविन लागवड केलेल्या फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे.  काढणीस तयार असलेल्या गुलाब व निशीगंध फुलांची काढणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळाऋतूमध्ये पशुधनाच्या शरीरावर जखमा झल्यास आसडी पडतात व अशा जखमा लवकर दुरूस्त होत नाहीत या जखमेवर कडूनिंबतेल + करंज तेल + टर्पेंटाईन तेलाचे समप्रमाणामध्ये मिश्रण करून संयूक्तपणे जखमेवर लावण्यासाठी वापर करावा.

सामुदासिक विज्ञान

घरातील कामे करताना जास्त मेहनतीच्या कामानंतर आणि कमी मेहनतीचे काम असा क्रम ठेवल्यास शारिरीक थकव्याचे प्रमाण कमी जाणवते.

(सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )