विविध पिकांच्या उत्पादन वाढ होऊन देशात हरितक्रांती झाली, देश अन्नधान्यात स्वयंपुर्ण झाला. परंतु त्या तुलनेत शेतकरी बांधवाचा आर्थिक उत्पन्नात वाढ झाली नाही. म्हणुन हरितक्रांती सोबतच शेतकरी बांधवाच्या उत्पन्न वाढीच्या अर्थक्रांती गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात दिनांक ६ जुलै रोजी आयोजित ६९ व्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर संचालक संशोधन डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार संचालक डॉ देवराव देवसकर, औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक डॉ डी एल जाधव, लातूर प्रतिनिधी श्री संतोष आळसे, कार्यालय प्रमुख डॉ सूर्यकांत पवार आदींची उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले की, कोरोना रोगाच्या काळात गेल्या वर्षभरात देशात व राज्यात आपण सर्व एका संकटाच्या छायाखाली वावरत आहोत, पण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे, अन्नधान्य या काळात शहरात अडकून राहिलेल्या लोकांना कृषी विभागाच्या मदतीने हे पोहचत होता, यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले आणि गरजूं ग्राहकांनाही लोकडाऊन काळात भाजीपाला व अन्नधान्य मिळाले हे मोठे उल्लेखनिय कार्य कृषी विभागाने केले आहे. विद्यापीठ विविध ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहोत. परभणी कृषी विद्यापीठाने आजवर अनेक शेतकरीभिमुख उपक्रम राबवित आहे. मागील तीन वर्षांपासून बियाणे विक्री केवळ विद्यापीठ मुख्यालयी न ठेवता, मराठवाड्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्रे खरीप व रब्बी हंगामात करून दिल्याने या तंत्रज्ञानाचा लाभ प्रत्येक जिल्हयातील शेतकऱ्यांना होत आहे. विद्यापीठ निर्मित जैविकखते व बुरशीनाशकांची उत्पादने देखिल सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. या कमी खर्चिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत झाली व पीक संरक्षण खर्च कमी होण्यास मदत होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने कृषी विद्यापीठ व कृषी विभाग प्रत्यक्षात उपस्थित राहून मराठवाड्याच्या शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाबाबत चर्चा करून ती उपयुक्त चर्चा शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी.
यावेळी डॉ दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, कृषी विद्यापीठ सातत्याने संशोधन करून शिफारशी देत आहे पण काळानुरूप हे संशोधन शेतकऱ्यांना अधिक सोयीचे होण्यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत. विद्यापीठ निर्मित सोयाबीन बियाण्याची २६ किलोची बॅग प्रति एकर पेरणीसाठी वापरावे, बीबीएफ पध्दतीने केवळ २२ किलो बियाणे लागते तसेच टोकन पध्दतीने लागवड केली तर केवळ एकरी १२ किलो बियाणे लागते. यामुळे विद्यापीठ शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊनच तंत्रज्ञान विद्यापीठ प्रक्षेत्रावर राबविण्यात येत आहे.
डॉ देवराव देवसकर म्हणाले की, शेतकरी हाच खरा प्रयोगशील आहे, अनेक प्रयोग शेतकरी स्वतःच्या शेतात राबवित असतात त्यांची नोंद विद्यापीठ घेत असते. विद्यापीठ, शेतकरी आणि कृषी विभाग यांच्या एकत्रित विस्तार कार्यातून जे चांगले तंत्रज्ञान नजरेत येते तेच पुढे इतर शेतकऱ्यांना आग्रहाने सांगितले जाते.
औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक डॉ डी एल जाधव म्हणाले की, विद्यापीठ तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांचा अतूट विश्वास आहे, त्यामुळे हे तंत्रज्ञान कृषि विभाग शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक वर्ष हे भिन्न आहे, पाऊस ऊन कमी अधिक असते, अशा परिस्थितीत सामोरे जाताना बऱ्याच वेळेस अनेक समस्या येत असतात, परन्तु मराठवाड्यात विद्यापीठ व कृषी विभाग एकत्रित समजून उमजून कामे करत असल्याने त्या समस्या सोडनविण्यास यश येत आहे.
बैठकीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते. विद्यापीठ शास्त्रज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ एस बी पवार यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ नितीन पतंगे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते प्रक्षेत्रावर वृक्षारोपण कार्यक्रम ही पार पाडला.