गोदापात्रात पाणवेलींचे साम्राज्य म्हणजे धोक्याची घंटा

निफाड तालुका वार्तापत्र दीपक श्रीवास्तव

गोदावरी नदी ही निफाड तालुक्यासाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी आहे. संपूर्ण निफाड तालुका सुजलाम सुफलाम करणारी गोदामाई आज पान वेलींच्या विळख्यात सापडून आपले अस्तित्वच हरवून बसली आहे. नाशिक तालुक्यातील लाखलगाव सोडल्यानंतर चेहेडी येथे गोदावरी निफाड तालुक्यात प्रवेश करते आणि कानळद येथे निफाड तालुक्याचा निरोप घेऊन अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करते. चेहेडी ते कानळद या 50 किलोमीटरच्या प्रवासात चेहडी, लालपाडी, दारणासांगवी, शिंपीटाकळी, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, गोंडेगाव, शिंगवे, करंजगाव, कोठुरे, चापडगाव, मांजरगाव, कुरडगाव, काथरगाव , नांदूर मधमेश्वर, खानगाव, तारुखेडले, तामसवाडी, करंजी, खेडले, झुंगे, सारोळे थडी, कोळगाव, कानळद अशी किमान दोन डझन गावे गोदावरी नदीच्या काठावर वसलेली आहे.

दरवर्षी गोदावरीला येणाऱ्या महापुराच्या तडाख्याने या सर्वच गावांना खूप मोठा फटका वारंवार सहन करावा लागत असतो. शंभर वर्षांपेक्षा जास्त जुने झालेले नांदूर मधमेश्वर धरणाचे दरवाजे 1969 च्या महापुरात निकामी झाल्यानंतर गोदापात्रात सातत्याने प्रचंड गाळ साचत जाऊन धरण्याची जलसंचय क्षमता जवळपास संपून गेलेली होती. साधारणतः आठ ते दहा वर्षांपूर्वी धरणाचे नूतनीकरण करण्यात येऊन गाळ कमी करण्याचे प्रयत्न झालेले होते यामुळे या धरणाच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेत वाढ तर झालीच शिवाय गोदाकाठाला दरवर्षी भेडसावणारा महापुराचा धोकाही कायमचा दूर होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. मात्र आपण ठरवावे काही एक आणि घडते काही दुसरेच अशी परिस्थिती आता बघायला मिळू लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून गोदापात्रात पान वेली व पान वनस्पतींचा प्रसार प्रचंड प्रमाणात होऊ लागला आहे.

या संपूर्ण परिसरात आता गोदावरी नदी पात्रात पाण्याचा प्रवाह दिसण्याऐवजी पाणवनस्पतींचे दाट रान माजलेले दिसून येते. यासर्व पानवेली गोदावरी नदी वरील ठिकठिकाणी बनवण्यात आलेल्या बंधाऱ्यांना, पुलांना आणि नांदूर मधमेश्वर धरणाला अडकून पाण्याचा फुगवटा तयार होतो.

हे अडलेले, तुंबलेले पाणी आजूबाजूच्या गावांमधील शेता शिवारांमध्ये पसरून पिकांची, शेतजमिनीची प्रचंड हानी होते. महापुराच्या तडाख्याने गोदावरीनदीवरील बंधारे आणि पूल तुटण्याचाही मोठा धोका निर्माण होतो. हे सर्व टाळण्यासाठी नदीपात्रातील प्रचंड वाढलेल्या वेली, वनस्पती तातडीने काढल्या जाणे आवश्यक आहे.

मात्र यासाठी लागणारा प्रचंड पैसा, मनुष्यबळ आणि इच्छाशक्ती या सर्वच गोष्टींचा प्रशासनाकडे अभाव असल्याने जेव्हा पाणी नाका तोंडात जाण्याची वेळ येईल तेव्हाच धावाधाव केली जाईल असे वाटते आहे. आपल्यावरची जबाबदारी दुसरीकडे ढकलण्याच्या प्रवृत्तीमुळे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन नसल्यामुळे एका ठिकाणच्या वनस्पती काढून किनाऱ्यावर टाकण्याऐवजी नदीपात्रात ढकलून देऊन पुढच्या गावा कडे रवाना केल्या जाताना आढळून येतात. पर्यायाने प्रश्न फक्त एका ठिकाणचा संपला तरी पुढच्या गावात मात्र हा प्रश्न दुपटीने चार पटीने वाढून जातो आणि शेवटी या सर्व वनस्पती नांदूर मधमेश्वर धरणाचा गेट मध्ये अडकून प्रचंड मोठे धरण फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. दरवर्षी महापूर आला की पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. हे सर्व टाळायचे असेल तर प्रशासनाने तातडीने हालचाल करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला पाहिजे.