पिक पद्धत बदलून फुलांचे आगार बनलेल्या तालुक्याची गोष्ट

धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यात पॉलीहाऊसमधील फुलशेतीने चांगलाच जोर धरला असून, गट शेतीच्या माध्यमातून शनिशिंगणापूर, वडाळा (बहिरोबा), कांगोणी परिसरात ग्रीन हाऊसमध्ये जरबेरा फुलांचे उत्पादन घेतले जात आहे. उसासारख्या पारंपरिक नगदी पिकांपासून फुलशेतीकडे वळालेले हे शेतकरी फुल शेतीतून चांगले उत्पन्न मिळवित आहेत. कृषी विभागाचे प्रोत्साहन व सहकार्य मिळत असल्याने दिवसेंदिवस अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळत आहेत.

देशात व परदेशात नेवासा तालुका हा धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. ज्या ‘पैस’ खांबाला संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी पाठ टेकवून ‘ज्ञानेश्‍वरी’ सांगितली, तो ऐतिहासिक खांब नेवासा येथे आहे. शिंगणापूर गावाच्या शनिमहाराज देवस्थानचे महात्म्य देश-विदेशात पसरले आहे. या दोन तीर्थक्षेत्रांमुळे नेवासा तालुका सर्वदूर परिचित आहे. याच तालुक्याजवळ गोदावरी, प्रवरा व मुळा या तीन नद्यांचा संगम झाला आहे. मुळा नदीमुळे व कालव्यांमुळे सुपीक बनलेला हा तालुका ‘बागाईतदारांचा तालुका’ म्हणून ओळखला जातो.

पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने ऊस हे नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांचे पारंपरिक पीक आहे. उसामुळे सधन बनलेला येथील शेतकरी आता मात्र उसाऐवजी इतर पर्यायी पिकांचा शोध घेत असल्याचे चित्र  आहे. कृषी विभागाच्या चांगल्या धोरणामुळे शेतकरी गटांच्या माध्यमातून या तालुक्यात पॉलीहाऊसमधील ङ्गुलशेतीने चांगलाच जोर धरला आहे. आजमितीला या तालुक्यात ३३ पॉलीहाऊस उभे राहिले असून, पॉलीहाऊस शेतीसाठी शेतकर्‍यांचे गट तयार होत आहेत. नेवासा तालुक्यातील लांडेवाडी, शिंगणापूर, कांगुणी, वडाळा बहिरोबा, हंडी निमगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे समूह फुलशेतीसाठी तयार होत आहेत.

शनिशिंगणापूरचा फुलशेतीचा महिमा
शिंगणापूर गावातील शनिमहाराज देवस्थानचे महात्म्य देश-विदेशात पसरल्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या तीर्थक्षेत्रास भेट देतात. पाण्याच्या चांगल्या उपलब्धतेमुळे येथील शेतकरीवर्ग हा तसा बर्‍यापैकी सधन होता. मात्र, तीर्थक्षेत्राच्या विकासामुळे गावातील अनेक लोकांना हॉटेल, लॉजिंग, पूजा साहित्य विक्री इत्यादी व्यवसायांतून शेतीसोबत आर्थिक उत्पन्नाचा एक नवा स्त्रोत मिळाला. गावाजवळील सोनई येथील सहकारी साखर कारखान्यामुळे ऊस हेच गावचे प्रमुख पीक बनले. मात्र, लांडेवाडीच्या दत्तात्रय सोनवणे यांच्या यशस्वी ङ्गुलशेतीमुळे त्यांची ख्याती आजूबाजूच्या परिसरात पसरू लागली होती. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी प्रमोद शिंदे यांच्या पुढाकारातून तालुक्यातील अनेक शेतकरी सोनवणे यांच्या फुलशेतीला भेटी देऊ लागले. शिंगणापूरच्या बर्‍याच शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतीस भेटी दिल्या व आपल्या गावातही फुलशेती करण्याचा निर्धार केला. दगडू पाटील शेटे, विक्रम शेटे, आबासाहेब शेटे, अमोल दरंदले, विष्णू दरंदले, पंकज लांडे या शेतकर्‍यांनी कृषी अधिकारी प्रमोद शिंदे यांची भेट घेतल्यावर त्यांनी या शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती देऊन सहलीचे आयोजन केले. पुढे या शेतकर्‍यांचे गट तयार करण्यात आले आणि मग पॉलीहाऊसमधील फुलशेतीच्या उभारणीसाठी शेतकरी झटू लागले.

या शेतकरी गटातील ज्येष्ठ शेतकरी दगडू पाटील शेटे या ङ्गुलशेतीच्या प्रकल्पाबाबत माहिती देताना म्हणाले की, शेतकरी गट स्थापन केल्यावर आम्ही या फुलशेतीबाबतची तांत्रिक माहिती घेण्यासाठी तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथील उद्यानविद्या विभागात पॉलीहाऊसचे आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. पॉलीहाऊसमध्ये कशा पद्धतीने ङ्गुलशेती केली जाते, याबाबतची इत्यंभूत माहिती आम्हाला या प्रशिक्षणामध्ये मिळाली. तसेच या शेतीच्या कर्जप्रकरणासाठी आवश्यक असणार्‍या प्रकल्प अहवालाबाबतचीही माहिती मिळाली.

प्रशिक्षणानंतर आम्ही सर्वांनी सोनईच्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडे कर्जाचा प्रस्ताव प्रकल्प अहवालासह सादर केला. बँकेनेही कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करता सर्वांना प्रोत्साहन देत या प्रकल्पास मंजुरी दिली. सर्व शेतकर्‍यांनी दहा गुंठे क्षेत्रात जरबेरा  लागवड केली. या प्रकल्पासाठी प्रत्येक शेतकर्‍यास १२ लाख रुपयांचा खर्च आला. यामधील १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य बँकेने दिले. पॉलीहाऊस उभारणीनंतर तीन महिन्यांतच पॉलीहाऊस बांधणीचे ३ लाख ६७ हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागाकडून प्राप्त झाले.

दरमहा २० हजार फुलांची विक्री
दहा गुंठे क्षेत्रामधून आम्ही प्रत्येक महिन्याला साधारणतः २० हजार फुलांची विक्री करतो. जरबेरा फुलाला वार्षिक सरासरी ३ रुपयांपर्यंत भाव मिळतो.
ङ्गुलाच्या विक्रीसाठी आम्ही पुणे, औरंगाबाद व हैदराबाद या बाजारपेठांना प्राधान्य देतो. दरवर्षी तुळशीच्या लग्नानंतर ङ्गुलांचा हंगाम सुरू होतो. या सिझनमध्ये एक ङ्गूल ४ ते १२ रुपयांपर्यंत विकले जाते. जरबेरा ङ्गुलातून मिळणार्‍या या चांगल्या उत्पन्नामुळे आम्ही गेल्या वर्षी आणखी १० गुंठे क्षेत्रात लागवड वाढवली आहे. आमच्या गावात आता आणखी १० ते १५ फुलशेतीचे प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

वडाळ्यातील युवकाचे धाडस
शिंगणापूरच्या दगडू पाटील शेटे यांच्या यशस्वी शेतीची प्रेरणा घेऊन शिंगणापूरपासून १० कि. मी. अंतरावर असलेल्या अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळा (बहिरोबा) या गावातील तरुण शेतकरी राहुल मोटे यांनी पॉलीहाऊसमधील फुलशेतीचा प्रकल्प आपल्या गावात सुरू करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पातील कर्जाच्या मोठ्या रकमेमुळे गावातील इतर कुणीही यासाठी पुढे आले नाही. मात्र, शिंगणापूरच्या या प्रकल्पाच्या यशाचे गणित मोटे यांच्या पक्के डोक्यात बसल्याने त्यांनी एकट्यानेच या प्रकल्पात उतरायचे ठरवले. मोटे यांनी शिंगणापूर व आजूबाजूच्या परिसरात ङ्गुलशेती करणार्‍यांशी संपर्क वाढवला. वेळोवेळी त्यांच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. पुण्यातील फुलांच्या बाजारपेठेस भेट दिली. तालुका कृषी अधिकार्‍यांनीही त्यांना प्रोत्साहन देत प्रकल्प सुरू करण्यास सांगितले. मोटे यांनी तळेगाव (दाभाडे)े येथील उद्यानविद्या विभागात आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये त्यांनी १० गुंठे क्षेत्रात जरबेरा ङ्गुलांची लागवड करून आपल्या गावातील पहिल्या पॉलीहाऊस प्रकल्पाचा श्रीगणेशा केला. या प्रकल्पासाठी त्यांना १३ लाख ५० हजार रुपये खर्च आला. त्यांना वडाळा येथील ‘बँक ऑफ बडोदा’ शाखेने १० लाखांचे अर्थसहाय्य दिले.

लागवड व्यवस्थापन
राहुल मोटे यांनी तळेगाव (दाभाडे) येथील ‘गोविंद ग्रीन हाऊस’ या कडून ग्रीन हाऊस बांधणीचे साहित्य घेऊन उभारणीस सुरुवात केली. यासाठी त्यांना १५ दिवसांचा कालावधी लागला. ग्रीन हाऊसची उभारणी केल्यावर रोपांसाठी गादीवाफे (बेड) तयार करण्यास १०० ब्रास लाल माती १० गुंठे क्षेत्रात टाकली. त्यानंतर या जमिनीत ५० किलोच्या १० गोण्या निंबोळी पेंड व ८ ट्रॉल्या शेणखत टाकण्यात आले. तसेच २०० किलो सुपर ङ्गॉस्ङ्गेट व १० किलो थायमेट टाकण्यात आले.

फुलांसाठी बेड बनवायला सुरुवात करताना जमिनीपासून ३ फूट उंचीचे व १.५ फूट लांबीचे बेड तयार करून मध्ये जाण्या-येण्यासाठी ३० ते ३५ सें. मी. जागा सोडण्यात आली. दोन रोपांमध्ये २८ सें. मी. अंतर ठेवून झिगझॅग पद्धतीने रोपांची लागवड करण्यात आली. दहा गुंठे क्षेत्रात त्यांनी ६ हजार १०० रोपांची लागवड केली. प्रतिरोप ३३ रुपये या दराने त्यांनी जरबेरा फुलाच्या रोपांची खरेदी केली. या संपूर्ण लागवडीत त्यांनी ड्रिपची व्यवस्था केली.

खत व्यवस्थापन
लागवडीनंतर दिवसाआड २ किलो १६ः००ः२४, १ किलो ००ः००ः५० व अर्धा किलो ००ः५२ः३४ ही खते द्यावी लागतात. आठवड्यातून एकदा अर्धा किलो कॅल्शिअम नायट्रेट व सूक्ष्म अन्नद्रव्ये
(मायक्रो न्युट्रियंट) (२०० मि. लि./
१ लिटर पाण्यात मिसळून) यांची मात्रा द्यावी लागते.

पॅकिंग पद्धत
साधारणपणे एका बॉक्समध्ये ५५० ते ६०० जरबेरा ङ्गुलांची पॅकिंग केली जाते. प्रत्येक ङ्गुलास एक छोटी प्लॅस्टिक कॅरीबॅग असते. या कॅरीबॅग १३५ रुपये प्रतिकिलो दराने बाजारात मिळतात. अशा अर्धा किलो कॅरीबॅग १ हजार ङ्गुलांचे पॅकिंग करण्यासाठी दररोज लागतात. तसेच ५०० ङ्गुलांना १०० नग रबर लागतात. दहा ङ्गुलांपासून एक गड्डी बनते व या गड्डीला खाली-वर बांधण्यासाठी या रबरांची आवश्यकता असते.

मार्केटिंग व्यवस्थापन
नेवासा तालुक्यातील शिंगणापूर, लांडेवाडी, वडाळा, कांगोणी येथील सर्व फुलउत्पादक शेतकरी मिळून एकत्रितपणे पुणे, औरंगाबाद व हैदराबाद येथील व्यापार्‍यांना माल पोहोच करतात. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव या सर्वांना सोयीचे ठरेल, अशा ठिकाणी सर्वांचा माल (फुले) गोळा करून एकत्रितपणे वाहनाद्वारे या तीनही ठिकाणी पाठविला जातो. पुणे व औरंगाबाद या ठिकाणी फुले नेण्यासाठी प्रत्येक बॉक्सला ८० रुपये तर हैदराबादला नेण्यासाठी प्रतिबॉक्स १६० रुपये खर्च येतो. या तालुक्यातील शेतकर्‍यांचा मागील दोन-तीन वर्षांपासून फूल व्यापार्‍यांशी संबंध असल्याने प्रत्येक दिवशी जो बाजारभाव ठरतो, त्यानुसार १५ दिवसांचे एकत्रितपणे पैसे व्यापारी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करतो.

अशा प्रकारे गट शेतीच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील शेतकरी ङ्गुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळवित आहेत. फुलशेतीतून येणार्‍या भरघोस उत्पन्नामुळे या शेतकर्‍यांचे आर्थिक जीवनमान सुधारले असून, त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन अनेक शेतकरी या प्रकल्पात उतरण्याचे धाडस करीत आहेत.  या तालुक्यात अनेक  पॉलीहाऊस उभे राहिले असून, शेतकरी गटाच्या माध्यमातून पॉलीहाऊसमधील फुलशेती करण्याकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढत आहे.

लांडेवाडी बनली फुलशेतीचा केंद्रबिंदू
शनिशिंगणापूर गावाजवळील कांगोणी येथील दत्तात्रय सोनवणे यांची लांडेवाडी येथे शेती आहे. सोनवणे यांनी ५-६ वर्षांपूर्वी जरबेरा फुलपिकाच्या माध्यमातून १० गुंठे क्षेत्रात पॉलीहाऊस उभारून तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या शेतीची मुहूर्तमेढ रोवली. गेल्या सहा वर्षांपासून ते जरबेरा ङ्गुलांचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेत आहेत. या शेतीतून मिळणार्‍या चांगल्या आर्थिक उत्पन्नामुळे त्यांनी १० गुंठे क्षेत्रावरून आता ३० गुंठे क्षेत्रापर्यंत ङ्गुलांची लागवड वाढवली आहे. दत्तात्रय सोनवणे यांची शेती हा तालुक्याचा ङ्गुलशेतीचा केंद्रबिंदू बनला असून, त्यांच्या शेतीतून प्रेरणा घेऊनच इतर ठिकाणी पॉलीहाऊसची उभारणी केली जात आहे.

लागवडीनंतर तीन महिन्यांनी उत्पन्न सुरू
लागवड केल्यानंतर फुले येण्यासाठी साधारणतः दोन महिने कालावधी लागतो. लागवडीनंतर १५ दिवसांनीच कळ्या यायला सुरुवात होते. मात्र, दोन महिने या कळ्या तोडाव्या लागतात. या कळ्या खुडल्यामुळे रोपांची क्षमता वाढते. लागवड झाल्यानंतर २१ दिवसांपर्यंत बेडवर दिवसातून एकदा पाणी मारावे (शॉवर) लागते. २१ दिवस शॉवरद्वारे पाणी मारल्यानंतरच ड्रिपद्वारे पाणी देण्यास सुरुवात करावी. या २१ दिवसांच्या कालावधीत खते, औषधे व टॉनिक हे हातानेच द्यावे लागते. त्यानंतर ड्रिपद्वारे हे सर्व दिले जाते. प्रत्येक महिन्याला झाडांवर बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्यक असते. लागवडीनंतर साधारणतः तीन महिन्यांनी बॅच सुरू होऊन उत्पन्न मिळणे सुरू होते. प्रत्येक महिन्याला सुमारे २० हजार फुलांची विक्री होते. दिवसाला ६०० ते ७०० फुलांची  तोडणी करावी लागते.