मुंबईमध्ये उद्योगात मराठी माणसाचा टक्का कमीच आहे. मात्र मराठवाड्यातून आलेल्या एका शेतकरी पुत्राने आपली सरकारी नोकरी सोडून जिद्दीने व्यवसाय उभारला आणि यशस्वी केला. नोकरी सोडून शर्टची निर्मिती करणाऱ्या अशाच प्रफुल्ल जगताप यांची ही यशकथा.
‘मी तसा आळशी म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे मी आयुष्यात काही चांगलं करू शकेल, यावर माझ्या घरच्यांचा विश्वास बसणे अवघड होते. मात्र स्वत:चा व्यवसाय यशस्वीपणे सुरू केला हे पाहिल्यावर आज माझ्याकडे पाहण्याचा माझ्या घरच्यांचा, आई–वडिलांचा दृष्टीकोन बदलला आहे. आयुष्यात मी खरंच काहीतरी करू शकतो यावर त्यांचा विश्वास आहे आणि मी सुरू केलेल्या स्टार्टअप बद्दल ते समाधानी आहेत.’ ठाणे शहरातील नेरूळ येथील २५ वर्षीय तरुण उद्योजक प्रफुल्ल जगताप सांगत होते.
ठाणे शहरातील नेरूळ येथे प्रफुल्ल जगताप यांनी अलिकडेच शर्ट तयार करण्याचा छोटा कारखाना सुरू केलाय. ‘विंग्जनॉट’ या नावाने त्यांची शर्टचा ब्रँडही नोंदविला आहे. सध्या कपड्यांच्या दुनियेत विविध ब्रँडस्ची चलती आहे. मग त्यात आपला स्वत:चा अस्सल महाराष्ट्रीय ब्रँड का नसावा असा विचार श्री. जगताप यांनी केला आणि त्यातूनच या उद्योगाचा जन्म झाला. मागील ७ ते ८ महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह कर्नाटकापर्यंत त्यांच्या शर्टचा पुरवठा होत असून शर्टचा दर्जा उत्तम राखल्याने दिवसेंदिवस त्यांच्या मालाला उठाव मिळत आहे.
सांगायची बाब म्हणजे प्रफुल्ल जगताप हे स्वत: बीई इलेक्ट्रिकल असून या क्षेत्राशी त्यांचा संबध उद्योग सुरू करण्याच्या विचारानंतरच आला. बीई झाल्यानंतर ते महावितरणमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांना २८ हजार रुपये महिन्याकाठी पगार मिळे. याबद्दल ते सांगतात,‘ नोकरी व्यवस्थित सुरू होती, पण माझे मन त्यात रमेना, मला काहीतरी स्वत:चे, वेगळे सुरू करायचे होते. पण काय ते कळत नव्हते. नोकरीत असताना याबद्दल मी अनेकदा विचार केला. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा असून याच क्षेत्रात काहीतरी करावे असे मला वाटले. त्यातून मी वस्त्राची निवड केली. पण मला कपडे विक्री करणारा दुकानदार व्हायचे नव्हते, तर स्वत: कपडे निर्माण करणारा उद्योजक व्हायचे होते. कपड्यांचा ब्रँड तयार करून त्यावरून आपली ओळख निर्माण व्हावी असे माझे स्वप्न होते. त्यातूनच शर्ट निर्मितीच्या संकल्पनेचा जन्म झाला.’
शर्टस्चा स्वदेशी ब्रँड उद्योग उभारणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी सर्वप्रथम त्यांना महावितरणमधील सरकांरी नोकरीचा त्याग करावा लागणार होता. याशिवाय जागा आणि भांडवलाचा प्रश्नही होताच.
जगताप हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्याचे. त्यांचे वडिल शेतकरी आहेत. जगताप यांना दहावीनंतर त्यांच्या मामांनी त्यांना पुढच्या शिक्षणासाठी मुंबईत आणले आणि ते मुंबईकर झाले. वडिलांना नोकरी सोडण्याची कल्पना मान्यच नव्हती. त्यांनी प्रचंड विरोध केला. हा मुलगा आयुष्यात काही करेल का? इतपत त्यांची बोलणी ऐकावी लागली, मात्र संपूर्ण नियोजन व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर ते एकदाचे तयार झाले. इतकेच नव्हे, तर त्यांनी व्यवसायासाठी काही पैसे देण्याचेही कबूल केले. मात्र तरीही भांडवलाची कमतरता होतीच. नेरूळ येथील नॅशनल को. ऑप. बँकेच्या माध्यमातून त्यासाठी अर्ज केला. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अवघ्या १० ते १५ दिवसांत बँकेने ५ लाखांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर भाडेतत्वावर एक जागा घेऊन शर्ट निर्मितीचा उद्योग सुरू केला.
या उद्योगाबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती, पण त्यांच्या जवळच्या मित्राने त्यात त्यांना तरबेज केले. मग धागा, कापडाचे प्रकार, रंग, शर्ट शिवण्याची यंत्रे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. आज त्यांच्याकडे ७ लोक कामाला आहेत. दिवसाकाठी अडीचशे ते तीनशे शर्टस्ची निर्मिती ते करतात. त्यांचा उद्योगही आता भरभराटीला येऊ लागला आहे. वितरक आणि ग्राहक दोघांनाही त्यांचा माल आवडू लागला आहे. नोकरीत असताना त्यांना केवळ एकट्यालाच पगार मिळे. मात्र आता ते इतर सात जणांना पगार देणारे उद्योजक झाले आहे. त्यांच्यामुळे सात कुटुंबांचा संसार आज सुखाचा झाला आहे.
- पंकज जोशी