दूध दराबाबत उद्या मंत्रालयात बैठक

मुंबई, दि.२०: दुधाचे दर घटल्यामुळे  दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी उद्या (मंगळवार, ता. २१) दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलावली आहे.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून ‘कोरोना’मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याने  दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे.

दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत . या विविध समस्यांच्या अनुषंगाने शेतकरी आणि दूध संघाचे प्रश्न समजावून घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात उद्या दुपारी दोन वाजता ही बैठक होत असून बैठकीला महानंद’ चे अध्यक्ष, दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे  प्रमुख,  तसेच राज्यभरातील  विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत.