तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ – अस्लम शेख
मुंबई, दि. २८ : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली असून याबाबतचे शासन आदेश देखील निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी दिली.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव/ जलाशयांची चालू वर्ष सन २०२१-२२ ची तलाव ठेका रक्कम व इष्टतम मत्स्य बोटुकली संचयनाची १० टक्के आगाऊ रक्कम भरण्यासाठीची मुदत दि.३१मे,२०२१ पासून पुढे सहा महिने (३० नोव्हेंबर २०२१) वाढविण्यात आली आहे. तसेच भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीज केंद्रांची चालू वर्षाची भाडेपट्टी रक्कम व पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवंर्धनासाठी १ टक्के व ०.५ टक्के क्षेत्र ठेक्याने दिलेल्या क्षेत्राची ठेका रक्कम भरण्यासाठीची मुदतही सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे.
‘कोरोना’ संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात घोषित टाळेबंदीमुळे मच्छिमार, मत्स्यसंवंर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना पुर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. तसेच उत्पादक मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मच्छिमार बांधवांना दिलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी शेवटी सांगितले.