गावकऱ्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यात ग्रामपंचायतीने बजावली महत्वाची भूमिका
अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या कोरोनामुक्त गावाचे उदाहरण समोर ठेऊन तसेच व्यापक जनजागृती ,कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे पालन , वेळोवेळी आरोग्य तपासणी आणि बाधितांचे विलगीकरण आणि सामुहिक इच्छाशक्तीला मिळालेली प्रयत्नांची जोड यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भोयरे खुर्द हे गाव पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे.
अहमदनगर शहरापासून 20 किमी अंतरावर डोंगर पट्ट्यात भोयरे खुर्द हे 1500 लोकवस्ती असलेल्या दुष्काळी गाव आहे . त्यामुळे या गावातील बहुतांश नागरिक रोजगारासाठी मुंबई तसेच अन्य शहरात असतात.मात्र राज्यशासनाने टाळेबंदी लागू केल्यावर हे सर्व कामगार मुंबई तसेच अन्य ठिकाणाहून गावी आले. गावात 3-4 कोरोना बाधितरुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावातील बाधितांच्या कुटुंबियांची अँटिजेंन कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यातील संशयित आणि लक्षणे असलेल्या व्यक्ती यांना विलगीकरणात ठेवण्यात आले .
कोरोना मुक्त गाव करण्यासाठी , त्यानंतरही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार वेळोवेळी गावातील सर्व कुटुंबांची, आशासेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. ताप, सर्दी खोकला आणि थकवा अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची अँटिजेंन टेस्ट करून त्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवण्यात आले असे या कामात सहभागी असलेल्या डॉ .सविता कुटे यांनी सांगितले.
याबरोबरच कोरोना होऊ नये यासाठी गावकर्यांनी आपली आणि कुटुंबाची कशी काळजी घ्यावी याची जनजागृती गावातील मंदिराच्या लाऊड स्पीकरच्या माध्यमातून दररोज सकाळ–संध्याकाळ करण्यात येत असे.
या जनजागृतीत मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे , वारंवार हात धुणे या वैयक्तिक काळजी बरोबरच गावकर्यांचा गावातील अनावश्यक वावर कमी करणे , वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आणि आवश्यकता भासल्यास विलगीकरण करणे या केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड जनजागृती मोहिमेतील महत्वाच्या मुद्द्यांचा भर दिला जात असे .
टाळेबंदी लागू झाल्यानंतर गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून भोयरे खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने याकाळात ‘गावबंद ‘हा उपक्रम राबविण्यात आला. त्या अंतर्गत गावकऱ्याना कामाशिवाय गावात फिरायला मनाई करण्यात आली आणि अत्यावश्यक असेल तरच बाहेर गावी जायला परवानगी दिली जात असे
गावातील नागरीकांना सक्तीने घरातून बाहेर काढून गावात बनवलेल्या विलगीकरण केंद्रात ठेवल्यामुळे कोरोना साखळी तुटण्यास मदत झाली आणि मे महिन्यात गावामध्ये एकही कोरोना बाधित आढळून आला नसल्याचे सरपंच राजेंद्र आंबेकर यांनी सांगितले.
या गावाचा आदर्श इतर गांवानी घेतल्यास इतर गावे कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही असे आंबेकर आवर्जून सांगतात.
कोरोना बाधित नागरिकांना समजावून सांगून, घरापासून दूर ठेवणे हे जिकरीचे काम असते.लोकांना विलगीकरण केंद्रात राहायला जायला प्रवृत्त करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवकाना प्रयत्न करावे लागतात. सुरुवातीला आमच्या गावातही यासाठी त्रास झाला असे ग्रामसेवक नंदकिशोर देवकर यांनी सांगितले. मात्र त्यानंतर नागरिकांना याचे महत्व पटू लागले आणि बाहेरगावाहून आलेले नागरिक कोविड केंद्रात राहायला सहजपणे तयार झाले आणि या सामुहिक उपाययोजना यांचा वापर करून भोयरे खुर्द हे गाव संपूर्ण कोरोना मुक्त झाले आहे असे देवकर म्हणाले .