द्राक्षबागांमधील भूरी व ईतर रोगाचे करा वेळीच नियंत्रण

सध्या परिस्थीतीत महाराष्ट्रात कोठे ना कोठे पाऊस व ढगाळ वातावरण, वादळी वारे चालू झालेले आहे. त्यामुळे तापमानात घट झालेली आहे व वातावरणातील आर्द्रता वाढत आहे. अशावेळी पावसामुळे जमिनीमध्ये वाढलेला ओलावा, हवेतील आर्द्रता व नंतरच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांमध्ये भूरी, दवन्या, करपा ईत्यादी रोगांची लागण होण्याची शक्यता दिसून येत आहे; किंबहुना या रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी बंधूनी सज्ज राहणे आवश्यक आहे.

) भूरी (Powdery Mildew) :

द्राक्ष पिकात भूरी या रोगाचा प्रादुर्भाव उन्सीनुला निकेटर (Uncinula necator) या बुरशी पासून होते. एप्रिल छाटणीनंतर पावसाचे प्रमाण कमी असल्यास पावसाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. द्राक्ष पिकाच्या सर्व भागावर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. बुरशीचे धागे प्रत्यक्ष वेलीच्या भागात प्रवेश न करता पृष्ठभागावरच वाढते. या बुरशीची सुरुवातीची लक्षणे पांढरट रंगाचे ठिपके व नंतर भुरकट पांढ-या रंगाची पावडर पसरल्यासारखी दिसते. पिकाचा सर्व भाग रोगग्रस्त होतो. रोगग्रस्त वेलीची वाढ खुंटून पानात विकृती येते. फुलोरा अवस्थेत या रोगाची लागण झाल्यास फलधारणा होत नाही व फार मोठे नुकसान होते.

रोगाचे नियंत्रण :

भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी ८०% पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम किंवा डिनोकॅप ५ मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा ट्रायडेमिफॉन २५० ग्रॅम किंवा पेनकोनॅझोल ५ मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अथवा हेक्झाकोनॅझोल ५ ई.सी. १० मि.ली. + पोटॅशिअम बायकार्बोनेट ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

) केवडा, दवन्या (Downy Mildew) :

डाउनी याला आपल्याकडे केवडा / दवन्या तर काही भागात साख-या या नावाने संबोधले जाते. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष वेलीची पाने केवड्या सारखी दिसत असल्याने यास केवडा असे म्हणतात. द्राक्ष पिकात या रोगाची लागण प्लास्मोपॅरा व्हिटीकोला (Plasmopara viticola) नावाच्या बुरशीमुळे होते. पानाच्या खालच्या भागावर सुरवातीला पिवळसर रंगाचे तेलकट ठिपके दिसतात. ठिपक्यांचा आकार वाढत जाउन त्यांच्या कडा तांबुस रंगाच्या होतात व पानाखालील बाजूस बुरशीची पांढरट वाढ झालेली दिसते.

रोगाचे नियंत्रण :

मेटॅलॅक्झील – मॅन्कोझेब (२ ग्रॅम/ लीटर), सायमोक्झॅनील – मॅन्कोझेब (२ ग्रॅम/ लीटर) किंवा फिनॅमिजेन – मॅन्कोझेब (२.५ ग्रॅम/ लीटर) किंवा क्रिसॉक्झीम (२५० मि.ली./ एकर) किंवा पायरॅक्लॉस्ट्रोबीन + मेटीरॅम (१.७५ ग्रॅम/ लीटर) या बुरशीनाशकाच्या फवारण्या रोगाच्या तिव्रतेनुसार अंतराने आलटून पालटून कराव्यात.

) करपा (Anthracnose) :

करपा या रोगाची लागण एल्सिनॉई अ‍ॅमोसलीना (Elsinoe amoslina) किंवा स्फॅसीलोमा अ‍ॅम्पेलिनम (sphaceloma ampelinum) या बुरशीमुळे होतो. द्राक्षाच्या पानावर करपा रोगामुळे गोल किंवा कोनात्मक बारीक ठिपके पडतात, व त्याला तपकीरी रंगाची कडा असते. असंख्य ठिपके ऐकमेकात मिसळून संपूर्ण पान करपते व त्यावर सुरुवातीच्या लागणीच्या ठिकाणी भोके पडतात.

रोगाचे नियंत्रण :

द्राक्ष पिकाच्या रोगट फांद्या तोडून जाळाव्यात , वेलीवर ०.६% बोर्डोमिश्रणाची किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशकाची ०.२५% तिव्रतेची (२५ ग्रॅम कॉपरऑक्सीक्लोराईड + १० लीटर पाणी) आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

-डॉ. राजेश राठोड, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण), मो. ७७७३९५२३०७

श्री.अजय दिघे, विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) व डॉ. दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक,

कृषि विज्ञान केंद्र (महात्मा फुले कृषि विद्यापीठ), मोहोळ जि. सोलापूर