तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रकाशगड मुख्यालयातून अतिरिक्त मनुष्यबळ पाठविण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्वप्रथम प्रवेश करून फार मोठा हादरा दिला आहे. या वेळी जिल्ह्यातील डोंगर, खाड्या आणि प्रचंड झाडी यांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. वारा आणि पाऊस यामुळे महावितरण कंपनीच्या वीज पुरवठा यंत्रणेची वाताहत झाली, यामध्ये 31 उपकेंद्रे तसेच शंभर पेक्षा जास्त फिडर बंद पडल्याने पूर्ण जिल्ह्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनी सिंधुदुर्ग मंडळ कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांचे स्थानिक ठेकेदार यांच्यासोबत रात्रंदिवस अथक प्रयत्न सुरू आहेत. परंतु झालेल्या हानीचा विचार करून जिल्ह्यात बारामती, सातारा आणि कोल्हापूर येथील 21 ठेकेदार संस्थांचे सुमारे 250 प्रशिक्षित कामगार, याशिवाय कल्याण, कोल्हापूर, भांडुप, बारामती, सांगली येथील नियमित 468 जनमित्र आणि 87 अभियंत्यांची टीम दि. 19 मे रोजी हजर झाली असून ते विविध ठिकाणी स्थानिक 234 जनमित्रांसोबत जोमाने कार्यरत झाले आहेत. याचवेळी जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या या अधिकारी व कामगारांसाठी सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीचा विचार करून आवश्यक दक्षता घेतली जात आहे. केवळ कोरोना विषयक दक्षता घेण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंहल, संचालक संचालन श्री. संजय ताकसांडे यांनी तसेच कार्यकारी संचालक श्री. बोडके यांनी परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुंबई येथील मुख्य अभियंता श्री. किशोर परदेशी, अधीक्षक अभियंता श्री. इब्राहिम मुलाणी यांना प्रतिनियुक्त केले आहे. हे वरिष्ठ अधिकारी तातडीने कार्यरत झाले असून त्यांनी एकूण उपकेंद्रे आणि फिडर यांची सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून माहिती घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी तात्काळ कामाला प्रारंभ केला आहे. यामुळे बंद पडलेल्या 31 उपकेंद्रांपैकी सर्वच्या सर्व 31 उपकेंद्रे पुन्हा सुरू झाली असून 78 फिडर सुरू करण्यात यश आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याने सद्यस्थितीत सर्व म्हणजे 25 कोविड हॉस्पिटलमधील वीज पुरवठा प्राधान्याने सुरू करण्यात यश प्राप्त झाले आहे आणि आता पाणी पुरवठा योजनाचा वीज पुरवठा अग्रक्रमाने सुरू करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. स्थानिक अभियंते व कामगारांना नव्याने प्राप्त अनुभवी अभियंते, ठेकेदार आणि प्रशिक्षित कामगार यांच्यामुळे नवे बळ प्राप्त झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्याने झालेली पडझड जनतेने संयमाने समजून विविध ठिकाणी आपला सहकार्याचा हात पुढे केला आहे. अनेक ठिकाणी तरुण मंडळे, स्थानिक लोकप्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्याने चक्रीवादळामुळे बाधित झालेला वीज पुरवठा तातडीने सुरू होईल असा दिलासादायक विश्वास मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर आणि सिंधुदुर्ग येथील अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दिनांक 19 मेपासून वीज यंत्रणा उभारणीच्या कामाला वेग आल्याने बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा सुरू आहे आणि यामुळे स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त करण्यात येत आहे.