मराठवाड्यात 19 ते 25 मे दरम्यान सरासरी पेक्षा जास्त पर्जन्यमान शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 17 व 18 मे, 2021  रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 19 मे ते 25 मे, 2021 दरम्यान पर्जन्यमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

सध्याच्या काळात वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग काढणी सुरू आहे, वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे,काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. उशिरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रस शोषण करणाऱ्या (फुलकिडे, मावा, तुडतुडे) किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास  इमिडाक्लोप्रीड 17.8 % 02 मिली किंवा थायमिथोकझाम 12.6 % +  लॅम्बडा  सायहॅलोथ्रिन  9.5 % 03 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड व वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी. सध्‍याच्‍या काळात हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत घडांना आधार द्यावा.वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकर करून घ्यावी. आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास  याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिद्रात पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे. द्राक्षे बागेत फुलकिडयांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्क किंवा  स्पिनोसॅड 45% 2.5 मिलि किंवा फिप्रोनिल 80% 0.6 मिली किंवा इमामेक्टीन  बेन्झोएट 5% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  पावसाची उघाड व वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी. द्राक्ष बागेत अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आल्यास 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून  पावसाची उघाड व वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी.सिताफळाच्या बागेत वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी तसेच बागेत विरळणी करावी. सिताफळ बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास  याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.

 भाजीपाला पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. वांगी पिकावरील शेंडा व फळ पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा  क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम  किंवा फेनप्रोपॅथ्रीन 30% ईसी 5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  पावसाची उघाड व वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

उन्हाळयात शक्यतो पट्टा पध्दत तुती लागवडीत शेंद्रिय पदार्थांचे किंवा पॉलिथीन (ब्लॅक) अच्छादन करावे. शेंद्रिय अच्छादनात गवत, काडीकचरा पिकांचे अवशेष झाडांची पाने, उसाचे पाचट इत्यादी किंवा साखर कारखान्यातील मळी (मोलेसीस) चा वापर करावा. आवकाळी पावसाने किंवा उन्हामुळे पाने वाळून त्याचा खत होतो. पट्टा पध्दत तुती लागवडीत एकास आड एक पट्टयात 2 X 2.5 X 1.5 फुट आकाराचा चर खदून त्यात वरील शेंद्रिय पदार्थ भरावेत असे केल्याने जमिनीचा पोत सुधारणा होते व कार्बन : नायट्रोजन चे प्रमाणात सुधारणा होते. 200 गेज काळे पॉलिथीन अच्छादनास एकरी आठ हजार रूपये लागतात परंतू 1 ते 1.5 एकर तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी असे अच्छादन करणे म्हणजे 2 ते 3 वर्ष निंदनीच्या खर्चात बचत होऊ शकते.

 पशुधन व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.  उन्हाळा ऋतू असला तरीही अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे किटकवर्गीय माशा जसे की डास, क्यूलीकॉईडस्‍ ईत्यादीचे प्रमाण वाढले आहे व त्यांचा प्रादुर्भाव पशुधनास जाणवत आहे. म्हणून अशि शिफारस करण्यात येते की पशुधनावर 5 % निंबोळी अर्क अथवा द्रावण (15मिली निंबोळी तेल + 15 ‍मिली कारंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण + 1 लिटर पाणी खूप वेळ ढवळणे) पशुधनावरती फवारावे.

सामुदायिक विज्ञान

इंग्रजी झेंडूंच्या फुलांची भुकटी पाण्यामध्ये उकळून त्यापासून रंग काढता येतो. हा रंग सुती, रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी अनुक्रमे 11%, 2% आणि 2% या प्रमाणात घेऊन वापरता येतो. इंग्रजी झेंडूच्या फुलांपासून रंग काढण्यासाठी व धागे रंगविण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ प्रमाणित करण्यात आला आहे. सुती धागे रंगविण्यापूर्वी, 10% हरडयाच्या द्रावणात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तुरटी, क्रोम, कॉपर सल्फेट आणि फेरस सल्फेट या रंगबंधकाचा वापर करून फिका ते गडद केशरी, गडद विटकरी अशा विविध रंगछटा मिळतात. धुणे, घासणे, घाम आणि सूर्यप्रकाश या सर्व बाबीसाठी रंगाचा पक्केपणा अतिशय चांगला आहे.

( सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )