शास्त्रीय पध्दतीने करा बीजप्रक्रिया व तपासा  बियाण्याची उगवण क्षमता

शेती उद्योगात बि-बियाण्यास असाधारण महत्त्व आहे. बियाणी हा शेतीमधला एक प्रमुख घटक आहे. बीजापासून वनस्पतीची पैदास होते. त्यामुळे उत्तम उगवणशक्ती असलेले उगवणशक्ती चांगले असलेले चांगल्या प्रतीचे सुधारित व कीड रोगांपासून मुक्त असलेल्या बियाण्यात बाजारात मागणी असते. पिकामध्ये रोगाची निर्मिती सर्वसाधारणपणे बियामार्फत, जमिनीमार्फत व हवेमार्फत होते. यामध्ये वेगवेगळे घटक रोग प्रसार करण्याकरिता भूमिका बजावतात जसे हवा, कीटक, शेतीचे साधने इत्यादी. बिजामार्फत अनेक हानीकारक रोगजंतूंचा प्रत्यक्ष व अअप्रत्यक्षरीत्या प्रसार होतो. बिजामार्फत होणाऱ्या रोगांमुळे शेतीची प्रत खालावते. अंकुरण न झाल्यामुळे रोपांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो. दुय्यम रोगाचा फैलाव होण्यास मदत होते. त्यामुळे नुकसानीची पातळी वाढते पीक संरक्षणाचा खर्च वाढतो. परिणामी उत्पादनात घट होते. तसेच दूषित बियाण्याच्या आकारमान व रंग बदलतो अशा बियाण्यात बाजारात भाव मिळत नाही. अशावेळी बियाण्याचद्वारे प्रसार होणाऱ्या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते सर्वसाधारण बियाण्यामार्फत पिकाचा पिकावरील रोग तीन प्रकारे असतात

  1. बियाण्याच्या बाह्य पृष्ठभागावर रोगकारक सूक्ष्मजीव असणे
  2. बियाण्याचा अंतर्गत भागात रोगकारक सूक्ष्मजीव
  3. रोगकारक बिजी फळे हलके बी रोगट बी चांगले बियाण्यामध्ये अनवधानाने मिसळले जाणे.

बीजप्रक्रिया म्हणजे काय :

बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळ्या जैविक व रासायनिक औषधाची प्रक्रिया केली जाते त्याला बीजप्रक्रिया असे म्हणतात

बीजप्रक्रियाचे फायदे :

  • जमिनीतून किंवा बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो.
  • बियाण्याची उगवण क्षमता वाढवते
  • सतेज आणि जोमदार वाढतात
  • पिकाच्या उत्पादनात वाढ होते
  • बीजप्रक्रियासाठी कमी खर्च येतो, त्यामुळेही कीड व रोगाचे नियंत्रण किफायतशीर पद्धतीने राखता येते

जिवाणूसंवर्धन बीज प्रक्रिया बाबत घ्यावयाची दक्षता

  1. जिवाणू संवर्धन प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा किटकनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर करण्यात यावी.
  2. जिवाणूसंवर्धन लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके,  बुरशीनाशके , जंतुनाशके इत्यादी लावलेले असतील तर जिवाणू संवर्धन नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावावे.
  3. रायझोबियम जिवाणूसंवर्धनाची प्रक्रिया पाकिट वर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गट समूहाने करावी.
  4. जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा रायझोबियम ऍझोटोबॅक्‍टर स्फुरद विरघळणारे जिवाणू या जिवाणूसंवर्धनाची बीजप्रक्रिया करता येते.

जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया

  1. २५० ग्रॅम जिवाणूसंवर्धकाची पॉकेट 10 ते 15 किलो बियाण्यास वापरावे,
  2. एक लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे.
  3. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक टाकून बियाण्यास हळुवार लावावे आणि जिवाणूसंवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात बसेल व बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  4. बियाणे ओलसर करून जिवाणू संवर्धनासारख्या बियाण्यास लावावे.
  5. नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुखवावे.
  6. असा बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी ताबडतोब करावी (24 तासात पेरणी करावी )
  7. पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही.
  8. जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजवुन जमीन सुधारण्यास मदत होते.

रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे

  1. बुरशीनाशकाच्या द्रावणात बी भिजवणे : प्रथमत: १०० किलो बियाण्यामध्ये एक लिटर पाणी टाकून याप्रमाणात भांड्यात एक मिनीटभर घोळवून ओलसर करावे. नंतर त्यात बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात टाकून पुन्हा हे बियाणे पाच मिनिटांपर्यंत लाकडी दांडा अथवा उलथाने वापरून चांगले घोळावे. बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावे. मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करायची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजपणे चिकटले त्यानंतर प्रक्रिया केलेल्या बियाण्यात सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
  2. बियाण्यास बुरशीनाशकाची भुकटी (पावडर) चोळणे: बियाण प्रक्रिया शिफारशीमध्ये दिलेल्या शिफारसीनुसार १ किलो बियाणास लागणाऱ्या बुरशीनाशकाचे प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावे. तत्पूर्वी बियाणे पाण्यात शिंपद देऊन ओले करून घ्यावे. अशी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. बुरशीनाशकाची घट्टसर द्रावणाची प्रक्रिया करावी ही प्रक्रिया मशीन किंवा यंत्राद्वारे करावी, प्रथमत: १०० किलो बियाण्यामध्ये एक लिटर पाणी टाकून ते ओलसर बियाणे बीजप्रक्रिया ड्रममध्ये घ्यावे. नंतर त्यात बुरशीनाशके दिलेल्या प्रमाणात टाकून ३० ते ४० वेळा फिरवावे. बियाणे मिश्रण कोरडे  होईपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करायची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिकटेल, त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया बाबत घ्यावयाची काळजी :

  • बियाणे प्रक्रियासाठी माती किंवा प्लॅस्टिक भांड्याचा वापर करावा या भांड्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू नये .
  • बीजप्रक्रियानंतर भांड्याचे झाकण किंवा प्लास्टिक पिशवीचे तोंड लगेच उघडू नये.
  • बीजप्रक्रिया नंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नये.
  • बीजप्रक्रिया करताना हातामध्ये रबरी मोजे घालावेत व तोंडाला मास्क लावावा.
  • बीजप्रक्रिया करताना तंबाखू खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टाळावे.

लागवडपूर्व उपचार

बियाण्यांना जीवाणू व विषाणूरहित करण्यासाठी त्यावर प्रचलित अथवा पारंपारिक पध्दतीने लेपन आदी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.त्यावर रासायनिक लेपन आदी केले जाते. त्यामुळे त्यावर रोग उद्भवण्याची शक्यता कमी असते.

उगवणशक्ती तपासणे

बियाण्याची उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे. ते यासाठी कि किती बियाण्यांची पेरणी करावी हे यातून ताडता येते. हे करावयास बियाणे हे पेरणीपूर्वी किमान १५ दिवस अगोदर खरेदी करावे व आपल्या ताब्यात घ्यावे. या बियाण्याच्या साठ्यातील सुमारे १०० दाणे काढून ते एखाद्या मातीच्या कुंडीत, ज्या शेतात त्यांची पेरणी करावयाची आहे तेथील माती घेउन, पेरावे. अशा बियाण्याचे सुमारे ८ ते १० दिवसात कोंब निघतात. किती कोंब निघाले यावरुन त्या विशिष्ट बियाण्याची उगवणशक्तीची टक्केवारी कळते. समजा,त्यापैकी ८३ कोंबच उगवले तर त्या बियाण्यांची उगवणशक्ती ८३% आहे असे अनुमान काढता येते.त्याप्रमाणात पेरणी करता येते.

बीजसंस्काराच्या पारंपारिक पद्धती

  • बी गरम पाण्यात भिजत ठेवणे.
  • बी थंड पाण्यात भिजत ठेवणे.
  • कोरडया बियांना औषध चोळणे.
  • रोपांची मुले द्रावणात बुडून ठेवणे.
  • बी कठीण पृष्ठभागावर घासणे.
  • बीजप्रक्रियेचे फायदे संपादन करा
  • बियांची उगवणक्षमता वाढते.
  • रोपांची किंवा पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
  • रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते.

बियाण्याद्वारे उद्भवणार्‍या रोगांच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया कमी खर्चाचा उत्तम उपाय आहे “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी”  या तुकाराम महाराजांच्या पद्धतीप्रमाणे जर बियाणे उत्तम प्रतीचे असेल तर त्यापासून मिळणारे उत्पादन चांगल्या गुणवत्तेचे असणार आहे. त्याप्रमाणे बियाण्याला कीड व रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी बीजप्रक्रिया केली जाते. यावरून बियाणे प्रक्रियाचे महत्व लक्षात येते यानुषंगाने शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येते की कोणतेही बियाणे वापरायचे असेल तर बीज प्रक्रिया केल्याशिवाय वापरू नये.

 

डॉ. भारती रामदासजी तिजारे व डॉ. अनिल साहेबराव तारू

शास्त्रज्ञ, कृषि षिज्ञान केंद्र, बुलढाणा

संपर्क: ७७०९५०३१८१, ९९६०२३२४८०