औरंगाबाद येथील खाम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या टीमसमवेत आज राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून या कामाच्या प्रगतीची माहिती आणि आढावा घेतला.
आमदार अंबादास दानवे, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता श्री. पानझडे, एसडब्ल्यूएमचे प्रभारी श्री. बोंबे, इकोसत्त्वच्या नताशा जरीन, गौरी मिराशी यांच्यासह स्मार्ट सिटी टीममधील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. ठाकरे यांनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी या कामाच्या प्रगतीबाबत सादरीकरण करण्यात आले. नदीचे पुनरुज्जीवन करत असताना त्याचे पर्यावरणीय वैशिष्ट्य जपत या कामामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग घेण्यात यावा, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. या नदीचे ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्व आहे. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी संशोधनात्मक दृष्टिकोन ठेवून करण्यात येत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. नियमित माहिती संकलनावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच नदीच्या पर्यावरणअनुरुप पुनरुज्जीवनासाठी कार्य करण्यात यावे. या कामासाठी नियमितपणे बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नदीच्या पुनरुज्जीवनामध्ये संबंधीत टीमने थोड्या कालावधीत चांगले काम केले आहे. या कामासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण पाठबळ दिले जाईल, असे मंत्री श्री. ठाकरे म्हणाले.