कोविडमुळे रिजर्व बँकेच्या विविध उपाययोजना

व्यक्ती, लहान उद्योग आणि एमएसएमईंना कर्जाचे पाठबळ पुरवण्याच्या विविध उपायांची घोषणा

कोविड-19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेविरोधात देशाच्या संघर्षाला पाठबळ देण्यासाठी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अनेक उपाययोजनांची आज घोषणा केली.

कोविड-19 विरोधात संघर्ष करणारे सरकार, रुग्णालये आणि दवाखाने, औषधालये, लस/ औषध उत्पादक/ आयातदार, वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादक/ पुरवठादार, अतिशय महत्त्वाच्या आरोग्य सामग्री पुरवठा साखळीमध्ये समाविष्ट असलेले खाजगी परिचालक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अचानक पडलेल्या आरोग्यविषयक खर्चाचा बोजा सहन करणारा सर्वसामान्य माणूस या सर्वांसाठी एक विशिष्ट समावेशक धोरणाची गरज आहे आणि त्यांना आर्थिक तरतुदी करताना येणाऱ्या अडचणी दूर करणे आवश्यक आहे. संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेचा सर्वात मोठा तडाखा लहान व्यवसाय आणि आर्थिक संस्थांना बसला आहे. या उपाययोजना महामारीविरोधात योग्य मापनाच्या आणि समावेशक धोरणाचा पहिला भाग आहेत, असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.

1) आकस्मिक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी 50,000 कोटी रुपयांची मुदत तरलता सुविधा

कोविड संबंधित आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि सेवा यामध्ये वाढ करण्यासाठी, आकस्मिक आरोग्य सेवा सहजतेने उपलब्ध होण्यासाठी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दराने तीन वर्ष कालावधीसाठी 50,000 कोटी रुपयांच्या मुदत तरलतेची घोषणा केली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत ही कर्जपुरवठ्याची सोय उपलब्ध राहाणार आहे. या सुविधेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांना विशेष प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.

 

2) लघु वित्तीय बँकांना विशेष दीर्घकालीन मुदत रेपो परिचालन सुविधा

सूक्ष्म, लघु आणि इतर असंघटित क्षेत्रातील संस्थांना आणखी पाठबळ देण्यासाठी प्रत्येक कर्जदाराला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी रेपो दराने तीन वर्षांची 10,000 कोटी रुपंयाची रेपो परिचालन सुविधा, ही सुविधा 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.

 

3) लहान वित्तीय बँकांकडून सूक्ष्म वित्तीय संस्थांना प्राधान्य क्षेत्राचे कर्ज म्हणून वर्गीकृत करण्यासाठी कर्जपुरवठा

नव्याने निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेता लहान वित्तीय बँकांना 500 कोटी रुपयांपर्यंतचे आकारमान असलेल्या सूक्ष्म वित्तीय संस्थांना नव्याने कर्ज देण्याची आता परवानगी देण्यात आली आहे. ही सुविधा 31 मार्च 2022 पर्यंत उपलब्ध असेल.

 

4) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) कर्ज       

बँकिंग क्षेत्राशी अद्याप जोडले न गेलेल्या MSME उद्योगांना बँकिंग प्रणालीत समाविष्ट करण्यासाठी उत्तेजन देण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी 2021 मध्ये देण्यात आलेली सवलत आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

5) व्यक्तीगत, छोटे उद्योग तसेच MSME उद्योगांवरील तणाव दूर करण्यासाठीचा आराखडा 2.0

व्यक्ती, कर्जदार तसेच MSME उद्योग या सर्वात असुरक्षित प्रकारच्या कर्जदारांना सहन कराव्या लागणाऱ्या ताणातून त्यांना मुक्त करण्यासाठी खालील उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

  1. जास्तीत जास्त 25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या अशा व्यक्ती, कर्जदार तसेच MSME उद्योग ज्यांनी याआधी कोणत्याही कर्ज चौकटीअंतर्गत पुनर्रचनेचा लाभ घेतलेला नाही आणि ज्यांचे 31 मार्च 2021ला प्रमाणित म्हणून वर्गीकरण झाले आहे अशांना निर्णय आराखडा 2.0 अंतर्गत पात्र मानले जाईल. नव्या आराखड्याअंतर्गत होणारी पुनर्रचना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरु राहील आणि त्याची अंमलबजावणी मदतीनंतर 90 दिवसांत लागू करावी लागेल.
  2. अशा व्यक्ती आणि छोटे उद्योग ज्यांनी निर्णय आराखडा 1.0 अंतर्गत कर्ज पुनर्रचनेचा लाभ घेतला आहे आणि ज्यामध्ये त्यांना कर्जफेड 2 वर्षांहून कमी कालावधीसाठी पुढे ढकलण्याची सवलत मिळाली आहे अशा कर्जदार संस्थांना आता कर्जफेडीसाठीचा कालावधी एकुण २ वर्षांपर्यंत वाढविता किंवा लांबविता येईल.
  3. जे छोटे उद्योग आणि MSME यांच्या कर्जाची पुनर्रचना याआधीच झाली आहे त्यांच्या बाबतीत कर्ज देणाऱ्या संस्थांना कर्जदारांच्या खेळत्या भांडवलाची मंजूर मर्यादा याबाबतीत आढावा घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

 

6) वाढीव ग्राहक संतोषासाठी KYC नियमावलीचे सुसूत्रीकरण 

यामध्ये  पुढील प्रस्तावित उपायांचा समावेश आहे: a) मालकी हक्क असलेल्या कंपन्यांच्या श्रेणींसाठी  दूरदृश्य प्रणालीद्वारे KYCची व्याप्ती वाढविणे, b) मर्यादित KYC खात्यांचे रुपांतर संपूर्णपणे KYC मान्यताप्राप्त खात्यांमध्ये करणे, c) KYC  अद्ययावत करण्यासाठी अधिक ग्राहक-स्नेही पर्यायांची सुरुवात करणे. आणि d) V-CIP  तसेच इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून सादर करता यावा म्हणून केंद्रीकृत KYC नोंदणी कार्यालयाच्या KYC अभिज्ञापकाचा वापर करणे.

 

7) बदलत्या तरतुदी आणि प्रतिचक्रीय सुधारणा व्यवस्था

बँका आता त्यांच्या अनुत्पादक मालमत्तांकरिता विशिष्ट तरतुदीं लागू करण्यासाठी त्यांच्या 31 डिसेंबर 2021 ला लागू असलेल्या बदलत्या तरतुदींचा 100% वापर करू शकतील; आणि ही सवलत 31 मार्च 2022 पर्यंत लागू आहे.

 

8) राज्यांना दिलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधेत शिथिलता

राज्य सरकारांना देण्यात आलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधेत मंजूर दिवसांची मर्यादा 36 दिवसांवरून वाढवून 50 दिवस करण्यात आली आहे. या सवलतीच्या वापरासाठी सलग 14 दिवसांची मंजूर संख्या वाढवून 21 दिवस करण्यात आली आहे. ही सवलत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत उपलब्ध आहे.

“My faith is brightest in the midst of impenetrable darkness” – Mahatma Gandhi

 ‘अभेद्य अशा अंधारात माझा विश्वास तळपता आहे’- महात्मा गांधी.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या विचारांचा उल्लेख करत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी, कोरोना संक्रमण आटोक्यात असतानाच दुसऱ्या लाटेत संक्रमणात झालेली मोठी वाढ  आणि मृत्यू यांच्याशी लढा देताना भारताने लस आणि वैद्यकीय सहाय्यात वाढ करत  संरक्षण उभे केल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत उपजीविकेला आधार आणि कामाच्या ठिकाणी जाण्यासाठीच्या संधी पुन्हा सुरळीत करणे, शिक्षण आणि  उत्पन्न  अत्यावश्यक ठरते याकडे यांनी लक्ष वेधले. विषाणूचा विघातक वेग लक्षात घेऊन,वंचित घटकांसह विविध घटकापर्यंत पोहोचणारी  त्वरित,व्यापक, सुनियोजित आणि वेळेवर पावले उचलण्यात आली.  या महामारीमध्ये निस्वार्थ भावनेने लढा देणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस,आणि इतर आघाडीच्या कर्मचाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. कोविड-19 च्या दुसऱ्या  लाटेचा  व्यापक अर्थव्यवस्था आणि वित्तीय स्थितीवर होणाऱ्या परिणामांकडे  रिझर्व बँक बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना  याची झळ कमी बसावी यादृष्टीने सरकार समवेत काम करणार असल्याचे ते म्हणाले.

अर्थविषयक सध्याच्या परिस्थितीबाबत त्यांनी केलेल्या मुल्यांकना मधले ठळक मुद्दे याप्रमाणे:

  • जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्याची चिन्हे दर्शवत आहे तर  देशांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये घडामोडी असमान राहिल्या असून नकारात्मक धोक्यांनी झाकोळल्या आहेत.
  • विकसित अर्थव्यवस्था आणि काही विकसनशील बाजार अर्थव्यवस्थामध्ये 2021 च्या उन्हाळ्यापर्यंत तर इतर बऱ्याच देशात 2022 च्या उत्तरार्धात लस उपलब्ध होईल या गृहितकावर आधारित आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणे निधीने एप्रिल 2021 मध्ये 2021 साठी जागतिक विकासदराचा अंदाज 5.5%  वरून 6% केला.
  • कृषी क्षेत्रात 2020-21 मधल्या विक्रमी अन्नधान्य उत्पादनामुळे अन्न सुरक्षा प्राप्त होण्याबरोबरच इतर क्षेत्रांनाही आधार मिळाला आहे. यंदा पाऊसमान साधारण राहण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे 2020-21 मध्ये ग्रामीण मागणी आणि  सर्वसाधारण उत्पादन कायम राहील अशी अपेक्षा आहे त्यामुळे चलनवाढीचा दबाव कमी राहील. स्थानिक आणि नियोजित प्रतिबंधात्मक उपाय व्यापार आणि घरांसाठी अनुकूल रहात आहेत.  परिणामी गेल्या वर्षाच्या तुलनेत  एकंदर मागणीवर परिणाम माफक राहील असा अंदाज आहे.
  • खाद्यान्न आणि इंधन चलनवाढीमुळे सीपीआय, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर मार्च 2021 मध्ये 5.5 % झाला, फेब्रुवारी मध्ये हा दर 5% होता.पाऊसमान सर्वसाधारण राहणार असल्याने अन्नधान्य किमती विशेषकरून तृणधान्ये आणि डाळीच्या किमती आटोक्यात राहण्यासाठी मदत होईल.
  • व्यापारी मालाची आयात आणि निर्यातीची कामगिरी जोमदार राहिली, एप्रिल 2021 मधेही कामगिरी चांगली राहिली.
  • परकीय चलन गंगाजळीच्या साठ्याने आपल्यला जागतिक संकटाला तोंड देण्यासाठीचा  विश्वास दिला आहे.
  • देशांतर्गत वित्तीय स्थिती अतिरिक्त तरलतेसह  सुलभ राहील.
  • बाजाराचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन 20 मे 2021 ला 35,000 कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांची दुसरी खरेदी आयोजित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

दुसरी लाट दुर्गम नाही. मानवी आयुष्य जपणे आणि सर्वतोपरी मार्गांनी उपजीविका पूर्ववत करणे या उद्दिष्टाना प्राधान्य आहे. वित्तीय स्थिती हितकर राहावी आणि बाजार प्रभावीपणे कार्यरत रहावा हे सुनिश्चित करण्यासाठी आरबीआय सज्ज असल्याचे ते म्हणाले. यामध्ये चाकोरीबाहेर आणि मागणीनुसार नवा प्रतिसाद देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.