मराठवाडा, मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे

आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने हवामानविषयक इशारे देण्यासाठी जारी केलेल्या अखिल भारतीय हवामान वृत्तानुसार, येत्या चार दिवसांत, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा तसेच केरळ यांसह देशाच्या विविध भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. या काळात, या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी या वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. या काळात विदर्भ, कोकण, गोवा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीच्या काही तुरळक भागासह देशाच्या अनेक भागांत  जोरदार विजा चमकतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गुजरात राज्यात तुरळक ठिकाणी आज उष्णतेची लाट जाणवेल. तर 28 आणि 29 एप्रिल या कालावधीत केरळमध्ये तुरळक ठिकाणी  अतिवृष्टीची दाट शक्यता आहे.

29,30 एप्रिल आणि 1 मे  या दिवशी राजस्थानमध्ये तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह वाळूचे वादळ येण्याची शक्यता आहे असा इशारा विभागाने दिला आहे.

स्थळविशिष्ट हवामान अंदाज आणि इशारे यांच्यासाठी कृपया “मौसम” अॅप डाऊनलोड करा. कृषीविषयक हवामान अंदाजासाठी “मेघदूत” अॅप डाऊनलोड करा आणि विजेबद्दलचे इशारे समजून घेण्यासाठी “दामिनी” अॅप डाऊनलोड करा. जिल्हानिहाय हवामानविषयक इशारे समजून घेण्यासाठी राज्याच्या हवामान केंद्राच्या किंवा प्रादेशिक हवामान विभागाच्या संपर्कस्थळाला भेट द्या.