रेल्वेने सज्ज ठेवली सुमारे 64 हजार खाटांची व्यवस्था

देशाच्या विविध भागांत वापरले जात आहेत रेल्वेचे 169 कोविड सुविधा डबे

कोविड विरोधात एकजूटीने सुरु असलेल्या लढ्यात सहभागी होत, रेल्वे मंत्रालयाने राज्यांच्या वापराकरिता सुमारे 64,000 खाटांची व्यवस्था असलेले जवळजवळ 4000 रेल्वे डबे सज्ज ठेवले आहेत.

सद्यस्थितीला यापैकी 169 डबे विविध राज्यांना कोविड उपचार सुविधेसाठी हस्तांतरित करण्यात आले आहेत.

नागपूर जिल्ह्यातून कोविड सुविधा असलेल्या रेल्वे डब्यांची नव्याने मागणी झाली आहे. त्यादृष्टीने, नागपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार, रेल्वे विभाग प्रत्येकी 11 डबे असलेल्या कोविड सुविधा गाड्या महानगरपालिकेला उपलब्ध करून देईल, या गाड्यांमधील प्रत्येक डब्यात, सुधारित शयनव्यवस्थेसह 16 कोविड रुग्णांची सोय होऊ शकेल. सामंजस्य करारात म्हटल्यानुसार, राज्य सरकारकडून या डब्यांमध्ये आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधांची सज्जता केली जाईल आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष जागेची व्यवस्था आणि उपयुक्त सुविधांसह स्वच्छता राखणे आणि खानपान सुविधेच्या पुरविणे याची जबाबदारी रेल्वे विभागाकडे असेल.

राज्यात, नंदुरबार येथे 57 रुग्ण सध्या या सुविधेचा लाभ घेत आहेत, त्यापैकी एका रुग्णाला आता तिथून हालविण्यात आले आहे. त्या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी 322 खाटा अजूनही उपलब्ध आहेत.