प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 2.0 ते 3.0 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात दिनांक 25 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या माहितीनुसार मराठवाडयात सध्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला दिसून येत आहे म्हणून सर्व फळबाग, भाजीपाला, फुलझाडे व चारापिके यांना पाणी देण्याची गरज आहे जेणेकरून पिकांना पाण्याचा ताण बसणार नाही.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 25 एप्रिल ते 1 मे, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. ऊस पिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.ऊस पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सध्याच्या काळात उशीरा लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
आंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी संत्रा / मोसंबी बागेत फळ गळ होऊ नये म्हणून जिब्रॅलीक ॲसीड 1.5 ग्राम 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.आंबे बहार डाळिंब बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील फुटवे काढावे. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला पिके
उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या कांदा पिकाची काढणी करावी.
फुलशेती व्यवस्थापन
हंगामी फुलझाडांची लागवड केली असल्यास उन्हापासून रोपांचे संरक्षण करावे. तसेच रोपांना नियमित व वेळेवर पाणी दयावे. रोपांना ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
उन्हाळयात वातावरणातील तापमान जास्त असल्यामुळे कुक्कुटघराचे तापमान कमी ठेवण्याकरीता छतावर पोते टाकुन त्यावर स्प्रिंकलर बसवावे व त्याचबरोबर शेडमध्ये पंखे, इग्जॉस्ट पंखे, फॉगरचा वापर करावा. कोंबडयावरील उन्हाचा ताण कमी करण्याकरता शेडच्या क्षमतेपेक्षा 10% ने पक्षांची संख्या कमी करावी आणि कोंबडयांना उन्हाळयात थंड पाण्याचा पुरवठा करून पाण्यामध्ये काही दिवसांच्या अंतराने पाण्यातून Electrolyte (इलेक्ट्रोलाईट) 1 ग्रॅम/ प्रति लिटर, व्हीटॅमिन ए डी3 इ सी 05 मिली/ 100 पक्षी व व्हीटॅमीन ई व सेलेनियम चे मिश्रण 10 ग्रॅम प्रति 200 पक्षाला द्यावे.
चारा पिके
उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या चारापिकात सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.
सामुदायिक विज्ञान
पिवळया रंगाच्या भाज्या व फळे जसे केळी, खरबूज व अंबा ही ऱ्हदय, डोळे आणि पचन संस्थेच्या उत्तम कार्याकरीता व प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. लाल रंगाची भाज्या व फळे जसे टोमॅटो, सफरचंद, टरबूज, स्ट्रॉबेरी व लाल सिमल मिरची यांचा आहारात समावेशकेल्यामुळे रक्त शुध्द होते व कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.
( सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )