ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी, अधिक उत्पादन निधण्यासाठी आपण सध्याच्या परिस्थितीला खुप मोठ्या प्रमाणात रासानिक खतांचा वापर करतो व सेंद्रिय खतांचा वापर कमी प्रमाणात करतो. परंतु पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे खुप गरजेचे आहे. तसेच जमिनीची सुपिकता वाढ्ण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. यासाठी आपण हिरवळीची खते, शेणखत, गांडुळ खत, कंपोस्ट इ. यांचा वापर करीत असतो. परंतु दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे व हिरवळीचे पिक घेऊन ते जमिनीत गाडण्यासाठी उपलब्धता व नंतर जे पिक आपणास घ्यावयाचे आहे, त्यासाठी पुरेसा वेळ हवा असतो. परंतु हे सर्व करीत असताना, आपले शेतकरी बंधु ऊस तोडणीनंतर ऊसाचे पाचट सर्रासपणे जाळून टाकतात व अतिशय उपयुक्त असलेल्या सेंद्रिय पदार्थाची राख करतो हा पर्याय शेतकरी बंधुना अतिशय सोपा वाटतो, परंतु त्यामुळे आपण सेंद्रिय पदार्थाची राख करतो, हे आपल्या कोणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ऊसातील पाचट व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात जवळपास १० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते व त्यापासून मोठया प्रमाणात ऊसाचे पाचट आपणास उपलब्ध होत असते. साधारणपणे एक हेक्टर ऊसाच्या क्षेत्रामध्ये आठ ते दहा टन पाचट उपलब्ध होते. ऊसाच्या पाचटामध्ये ०.४० ते ०.५० टक्के नत्र, ०.२० टक्के स्फूरद आणि १ टक्के पालाश तसेच ३२ ते ४० टक्के सेंद्रीय कार्बन असते. अशी बहुमूल्य फायद्याची पाचट जाळल्यामुळे त्यातील सेंद्रिय कर्ब पूर्णतः जळून जातो व त्यातील नत्र तसेच स्फुरद ९० टक्क्यांपेक्षा जास्त जळून जातो, हे पाचट जाळून टाकण्याऐवजी त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच रासायनिक खतांच्या किमती ह्या गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे शेतक-्यांना ते न परवडणारे आहे.
शेतकरी जाळ्त असलेले ऊसाचे पाचट जर आपण खोडवा ऊसात आच्छादनासाठी वापरले तर ते आपणास खूपच मोठ्या प्रमाणात फायद्याचे ठरणार आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये ऊस गेल्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने त्या पाचटाची भुकटी करुन घ्यावी किंवा पाचट गोळा करुन ते नवीन लागवड करावयाच्या प्रत्येक सरीमध्ये पाचट दाबुन घ्यावे व त्यामध्ये प्रति हेक्टरी ६० ते ८० किलो युरीया, ९० ते १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १० ते १५ किलो पाचट कुजविणारे जिवाणु (Decomposer) वापरावे. त्यामुळे ते पाचट लवकर कुजण्यास मदत होते. व शेतात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढुन उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. तसेच अन्नद्रव्यांचीही उपलब्धता वाढते. त्यामुळे ऊस वाढीसाठी चांगला उपयोग होतो.
बऱ्याच शेतकरी बंधुंच्या अशा समस्या असतात की, पाचट जास्त असल्याने ते सरीमध्ये व्यवस्थित बसत नाही, आंतर मशागत व्यवस्थित करता येत नाही. त्यासाठी सर्व शेतकरी बंधुनी ऊस पाचटाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ऊस लागवडीपासुन तयारी करावी. ऊस लागवड करताना दोन सरींमध्ये चार ते साडे चार फूट एवढे अंतर ठेऊन लागवड करावी. त्यामुळे ऊसातील पाचट एकाआड एक सरी पसरविल्यास मोकळ्या सरीतून आपल्याला आंतर मशागत करता येते व तसेच पट्टा पध्दतीने लागवड केल्यास अधिक चांगले, कारण मोकळ्या पट्ट्यात पाचट व्यवस्थित बसु शकते व पिकांमध्ये हवा खेळती राहण्यासही मदत होते. पूर्वहंगामी लागवड असल्यास पावसाळ्याच्या सुरुवातीस जुन-जुलै महिण्यात ऊसाचे खालचे वाळलेले पाचट काढून सरीत गाडल्यास ते ऊस तोडणीपर्यंत चांगल्या प्रकारे कुजुन जाते व तोडणीच्या वेळी बरेच पाचट कमी झाल्याने ते सरीत व्यवस्थित बसते.
पाचट जाळल्याने होणारे तोटे :
१. पाचट जाळल्यामुळे सेंद्रीय कार्बन, नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा नाश होतो.
२. पाचट जाळल्यामुळे १०० टक्के नत्र व ७५ टक्के इतर अन्नघटक वाया जातात.
३. पाचटावर असलेल्या मित्रकिटकांचा सुध्दा नाश होतो.
पाचट आच्छादनाचे फायदे :
१. जमिनीच्या पृष्ठभागावरुन होणाऱ्या बाष्पीभवनांचा वेग कमी होऊन जमिनीत ओलावा जास्त काळ टिकण्यास मदत होते.
२. पाचटाचे आच्छादन असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो
३. वेगवेगळी सेद्रीय खते घालण्याची गरज नाही, कारण पाचटाव्दारे हेक्टरी ४ ते ५ टन सेंद्रीय खत मिळते.
४. सेंद्रय पदार्थामुळे उपयुक्त जिवाणुंची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे जमिनीची सुपिकताही मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते.
श्री. मयुर नवले, श्री. कपील निर्वळ
– Phone no.: ९१९४०४०२८१६४