केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज नवी दिल्लीत ,नाफेडच्या ‘मधुक्रांति पोर्टल’ आणि हनी कॉर्नर्स या प्रकल्पांचा आरंभ केला. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियान (एनबीएचएम ) अंतर्गत राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाचा ( एनबीबी)हा उपक्रम आहे . डिजिटल मंचावर मध आणि मधमाशांशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने ऑनलाईन नोंदणीसाठी हे पोर्टल विकसित केले आहे .हा डिजिटल मंच विकसित करण्यासाठी इंडियन बॅँक तांत्रिक आणि बँकिंग भागीदार असून या प्रकल्पासाठी एनबीबी आणि इंडियन बँक यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
या शुभारंभ कार्यक्रमाला संबोधित करताना तोमर म्हणाले की, मध अभियानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, रोजगार निर्मिती होईल आणि निर्यातीत वाढ होईल. मधुर क्रांतीचा प्रसार देशभर व्हायला हवा आणि भारतीय मध हा जागतिक मापदंडांची पूर्तता करणारा असावा,असे ते म्हणाले. या पोर्टलवर मध आणि मेण आणि पोळ्यापासून अन्य वस्तू उत्पादन, विक्री आणि विपणन साखळी यात सहभागी सर्व भागधारकांची माहिती संकलित करणारा डेटाबेस तयार करण्यासाठीआवश्यक कार्ये विकसित केली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील मधुमक्षिका पालकांची ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरू केली जात असून त्यापाठोपाठ मध व्यापारातील अन्य भागधारकांची नोंदणी सुरु आहे . दुसऱ्या टप्प्यात, मधाचा स्रोत शोधण्याच्या क्षेत्रात इच्छित परिणाम प्राप्त करण्यासाठी देशातील मध व्यापारातील सर्व विक्री व्यवहार मोबाइल ॲपद्वारे टिपले जातील.
एफपीओ अर्थात शेतकरी उत्पादक कंपन्यांना विपणन साहाय्य्यतेसाठी नाफेडने 14-15 हनी कॉर्नर विकसित केले आहेत, आश्रम, न्यू मोती बाग आणि पूर्व कैलास, पंचकुला आणि मसुरी येथील बाजार/ घाऊक दुकाने अशा 5 नाफेड बाजारात प्रत्येकी एक हनी कॉर्नर आहे. मध आणि मधमाशांच्या अन्य उत्पादनांसाठीच्या बाजारपेठ साहाय्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने , नाफेडकडून आगामी 200 मोठ्या नाफेड स्टोअरमध्ये अधिक हनी कॉर्नर विकसित केले जातील. एफपीओद्वारे पुरवठा केलेल्या मधाचे विपणन आणि जाहिरातीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ऑनलाइन विपणन पर्याय शोधले जातील .
मधुमक्षिका पालनाचे महत्व लक्षात घेऊन , वैज्ञानिकदृष्ट्या मधुमक्षिका पालनाचा सर्वांगीण प्रसार आणि विकासासाठी आणि “मधुरक्रांति”चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारने आत्मनिर्भर भारत अंतर्गत घोषित, राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियान (एनबीएचएम) नावाच्या मध्यवर्ती क्षेत्रातील 500.00 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या नवीन योजनेला सरकारने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियानाची अंमलबजावणी केली जाते . या योजनेत तीन लघु मोहिमा आहेत . (एमएम -I, II आणि III) या मोहीमांअंतर्गत जागरूकता, क्षमता बांधणी वाढ / प्रशिक्षण, मधुमक्षिका पालनाद्वारे महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणे, आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे यावर जोर दिला जातो.
मधाच्या गुणवत्तेशी संबंधित मुद्यांवरील समस्या सोडविण्यासाठी, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय प्रयत्नशील असून त्यादृष्टीने , राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियानाअंतर्गत मध आणि मधमाशांपासून मिळणाऱ्या अन्य उत्पादनांचा स्रोत जाणून घेण्यासाठी दर्जेदार चाचणी प्रयोगशाळा आणि ऑनलाईन नोंदणी / शोध यंत्रणा विकसित केली जात आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री. पुरुषोत्तम रुपाला आणि श्री कैलाश चौधरी, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव श्री संजय अग्रवाल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व भागधारक यावेळी उपस्थित होते.