खरीप हंगामाच्या नियोजनासाठी ऑनलाईन कार्यशाळा

हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी ‘पोक्रा’चा पुढाकार

मुंबई, दि. 7 :- महाराष्ट्र शासन व वर्ल्ड बँक यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी तथा पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित गावनिहाय खरीप हंगामातील पीक नियोजनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या संदर्भात मोफत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

गुरुवारी, 8 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वाजता पोक्रा महाराष्ट्रच्या https://youtube.com/c/PoCRAMaharashtra या लिंकवरून या कार्यशाळेत सर्वांना थेट सहभागी होता येणार आहे. सर्व सरपंच, उपसरपंच व ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्य व शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन पोक्राचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी केले आहे.

‘शेती नियोजनात सरपंचांची भूमिका’ या विषयावर आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ हे समृद्ध गावासाठी शेतीचे नियोजन या विषयावर, तर आयआयटी मुंबईचे प्रा. मिलिंद सोहोनी हे पाण्याचा ताळेबंद या विषयावर आणि एकूण खरीप हंगाम नियोजनाबद्दल पोक्राचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी मार्गदर्शन करणार आहेत.

त्याचबरोबर ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित पिकांचे नियोजन या विषयावर डॉ.मेघना केळकर, ‘बदलत्या हवामानात शेतीची तंत्रे’ या विषयावर कृषिविद्यावेत्ता विजय कोळेकर बोलणार आहेत.

तरी, https://youtube.com/c/PoCRAMaharashtra या लिंकवरून सरपंच, पदाधिकारी व शेतकरी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी केले आहे.

हवामान बदलामुळे जागतिक पातळीवर येणाऱ्या विविध संकटांना शेतकऱ्यांनी सक्षमपणे सामोरे जाता यावे, तसेच शाश्वत अशा हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी खरीप हंगामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे ठरते.