महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय’ या विषयावर व्याख्यान
नवी दिल्ली, दि. ३ : शेती हा महाराष्ट्राच्या मातीचा धर्म आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच शेतकरी धर्माची पताका रोवली. शेतकरी धर्माचा माणूस पोटाशी घेतला आणि त्याच्या गरजा समजून घेत धोरणे आखली, असे मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी आज केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे सोळावे पुष्प गुंफताना ‘कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय’ या विषयावर श्री. देशमुख बोलत होते.
शेती हा महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला धर्म आहे. पाऊस पडला की या धर्माचे लोक फुलारुन येतात आणि दुष्काळ पडला की उदासून जातात. छत्रपती शिवरायांनी हा शेतकरी धर्माचा माणूस आपल्या पोटाशी घेतला होता. आणि याला काय हवे आहे हे त्यांनी समजून घेतले तसे धोरणे आखली व त्याची अंमलबजवाणी केली म्हणूनच ते शेतकऱ्यांचे राजे ठरतात. त्या-त्या प्रदेशात राबणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने त्या प्रदेशाला घडवत असतो. भारतीयत्व आणि शिवाजी महाराज यांच्याकडे बघताना या प्रदेशाला शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळख मिळवून देणारे शिवाजी राजे या अर्थाने त्यांचे भारतीयत्व सर्वश्रेष्ठ ठरते, असे श्री देशमुख म्हणाले.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवरायांना ‘कुळवाडी भूषण’ ही उपाधी दिली. दक्षिणा प्राइज कमेटीने स्पर्धा ठेवली होती त्या स्पर्धेसाठी महात्मा फुलेंनी पोवाडा लिहिला त्यात त्यांनी ‘मासा पाणी खेळे कोण गुरु असे त्याचा?’ अशा स्वरूपाचे विधान केले आहे. शिवाजी महाराज ज्या वातावरणात जन्माला आले त्याच वातावराणाच्या संस्कारातून ते घडले व रयतेचे राजे झाले हे या ओळींमधून कळते असे त्यांनी सांगितले.
‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ शिवाजी महाराजांनी लिहिला आहे (अप्रत्यक्षपणे). या ग्रंथाच्या प्रस्तावनेत महाराष्ट्र सोडून आग्र्याकडे मार्गस्थ होत असताना महाराजांनी हे राज्य कसे असले पाहिजे याचे निरूपण रामचंद्र पंत अमात्यांना केले आहे. आणि शिवाजी महाजांच्या निर्वाणानंतर रामचंद्र पंत अमात्यांनी ते एकूण ९ प्रकरणांमध्ये लिहिले आहे. राज्याच्या सर्व अंगांना दिशादर्शक अशा सूचना शिवाजी महाराजांनी केल्याचे या ग्रंथात दिसते .
शेती आणि गावगाडा यांचे नाते शिवरायांच्या वेगवेगळ्या धोरणातून दिसून येते. शिवरायांनी सर्व बलुतेदारांना पोटाशी घेतले आहे. पुणे व परिसरात ओसाड पडलेल्या भूमीला जिवंत करण्याचे, शेतकऱ्यांना आश्वासित करण्याचे त्यांना पुन्हा उभे करण्याचे ,पडीक पडलेल्या जमिनी पुन्हा उभ्या करण्याची भूमिका मांडून शिवरायांनी त्याची अंमलबजावणी केली ,असे श्री देशमुख म्हणाले.
शिवरायांमध्ये टोकाची संवेदनशीलता
सामान्य कष्टकरी, आदिवासी , गिरीजन, महिला डोंगरदऱ्यात वास करणारी माणसं अशा सर्व समाजघटकांना कवेत घेण्याचे सामर्थ्य असणारे छत्रपती शिवाजी हे एकमेव राजे असल्याचे दिसते. शूद्र, दलित यांना कवेत घेणारे महिलांचे भाऊ-वडील म्हणून जबाबदारी घेणारे असे छत्रपती शिवराय हे नखशिखान्त नैतिकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
भक्ती परंपरा आणि शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पार्श्वभूमी येथील भक्ती परंपरेने तयार केली आहे. ‘राईज ऑफ मराठा पावर’ या ग्रंथात महादेव गोविंद रानडे यांनी संतपरंपरा आणि शिवाजी महाराजांचे नाते जोडलेले आहे. महाराष्ट्रातील भक्ती परंपरा सजग, सत्वशील आणि समाजाभिमुख होती. हीच भूमिका गं. बा. सरदारांनीही मांडली आहे, तलवारीतून शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या कणसांचे रक्षण करणारा हा मध्ययुगातला राजा आहे जो कालिकदृष्टया मध्ययुगातला मात्र जगण्याच्या पातळीवर सर्वार्थाने आधुनिक स्वरूपाचा आहे,असे ते म्हणाले.
शिवबा आणि तुकोबा
छत्रपती शिवराय आणि संत तुकाराम महाराज यांचे नाते कालबाह्य न होता सतत काळाला पुढे घेऊन जाणारे दिसते. तुकोबांचा एक एक अभंग एक आभाळ व त्याचे निरूपण हे काळाला वळण लावणारे आहे. शिवाजी आणि तुकोबा समकालीन आहेत. ‘शेतकऱ्यांमधला पहिला राजा म्हणजे शिवाजी व पहिला साधू म्हणजे तुकोबा’ हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विवेचन फार महत्त्वाचे वाटते. यातून शिवबा-तुकोबांचे नाते कालिक अर्थानेच महत्त्वाचे नाही तर यात श्रेष्ठ भारतीयत्व असल्याचे दिसून येते. राजाच्या वेशात फिरणारे शिवाजी राजे हे तुकोबा तर नाहीत? किंवा संतांच्या वेशात फिरणारे तुकोबा हे शिवबा तर नाहीत ?असे आंतरिक पद्धतीचे हे नाते आहे. या दोघांच्या अंत:प्रेरणा एक आहेत.
‘बुडते हे जग देखवे ना डोळा’, ‘खोल ओलपणे ते बीज उत्तम’, ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा’ ही तुकोबाची अंत:प्रेरणा छत्रपती शिवरायांनी आपल्यात मुरवली होती व त्यातून त्यांची राजकीय कृती घडत होती. एका बाजूने तुकोबा अभंगाचे माध्यम वापरतात तर शिवाजी महाराज राजकीय कृतीचे माध्यम वापरतात पण दोघांची उद्दिष्ट्ये समान होती असे श्री. देशमुख म्हणाले.
छत्रपती शिवरायांनी भाकरीची शाश्वती निर्माण करण्याची आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली . शिवरायांना समजून घेताना कृती व विचारातून समजून घ्यावे लागेल व त्यांच्या कृतीचा एक जरी अंश आपण जीवनात उतरवू शकलो तर शिवरायांना ती आदरांजली ठरेल अशी अपेक्षाही श्री. देशमुख यांनी व्यक्त केली.