नाशिक, ता. २५ अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसानीचे सत्र कायम असून नुकसानीची आकडेवारी दिवसागणिक वाढत आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीने जिल्ह्यात पावणेसहा हजार हेक्टरवरील कांदा, गहू, मका पिकांचे नुकसान झाले असताना मंगळवारच्या पावसाने पुन्हा यामध्ये भर घातली. बागलाण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. तीन दिवसांत साडेसात हजार हेक्टरवरील कांदा पीक उद्ध्वस्त होऊन ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तीन दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागास अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसत आहे. बुधवारचा दिवसही त्यास अपवाद ठरला नाही. रब्बी पिकांसह उन्हाळी कांद्याला मोठा फटका बसला आहे. प्रारंभीच्या दोन दिवसांत जिल्ह्यातील ८६ गावांतील सात हजार ५२१ शेतकऱ्यांना झळ बसली होती. पाच हजार ७०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये मालेगाव तालुक्यातील तीन, सटाणा ४७, कळवण दोन, दिंडोरी पाच, निफाड ११, सिन्नर तालुक्यातील १८ गावांचा समावेश होता.
वीज पडून निफाडमध्ये एकाचा मृत्यू झाला तर पशुधनाचेही मोठे नुकसान झाले. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असताना नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. मंगळवारी बागलाणमधील केरसाणे परिसरात गारपीट झाली. त्यामुळे कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो पीक भुईसपाट झाले.
बागलाण तालुक्यात तीन दिवसांत ६७ गावांना फटका बसला. मुख्य पीक कांद्याची मोठी हानी झाली. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून कांदा पीक घेतले होते. परंतु हेक्टरी ८० ते ९० हजार रुपये खर्च करून उभे केलेले पीक क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कृषी विभागाच्या साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा पीक बाधित झाल्याचा अंदाज आहे. काढणीवर आलेले गहू आणि हरभरा पिकाची अक्षरश: माती झाली. दरम्यान, नुकसानग्रस्त भागाची आमदार दिलीप बोरसे यांनी पाहणी केली.
आम्ही जगावे कसे?
कान्हेरी नदीच्या तीरावर वसलेले नैसर्गिकरीत्या सुंदर असलेल्या के रसाने गावात अवकाळी पाऊस, गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. कष्टाने उभी केलेली पिके कांदा, टोमॅटो आणि भाजीपाला भुईसपाट झाल्याने शेतकरी सुन्न झाले. पुढील कांदा बियाण्यासाठी लावलेले बी नाहीसे झाले. बियाण्यांसाठी पुढेही संघर्ष करावा लागेल. गावावर आजपर्यंत असे अस्मानी संकट आले नव्हते. प्रत्येक घरात सायंकाळी चूल पेटली नाही. वर्षभरापासून करोनाला तोंड देऊन अडचणींवर मात करून शेतकरी उभा राहिला. शेतात पिके उभी केली. डोळ्यासमोर काढणीयोग्य सर्व पिके नष्ट झाली. आता जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी अशोक मोरे यांनी केला.
भाजीपाला भुईसपाट
बागलाण तालुक्यातील कान्हेरी, करंजाडी, मोसम खोऱ्यात टोमॅटो, मिरची, टरबूज, काकडी, घेवडा आदी भाजीपाला पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. या भागात ८०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हे पीक घेतले जात असून ते गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई येथील व्यापारी बांधावर खरेदी करून घेऊन जातात. जोमात असलेले भाजीपाला पीक गारपिटीमुळे होत्याचे नव्हते झाले. हजारो रुपये खर्च करून उभे केलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत