बांबूच्या मागणीत आणि लागवडीत वृध्दी करण्यासाठी बांबूचा विविध प्रकारे उपयोग वाढविण्याचे केले आवाहन
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बांबू तंत्रज्ञान, उत्पादने आणि उपयोग यावरील एका व्हर्च्युअल प्रदर्शनाच्या उदघाटनाला संबोधित केले. हे प्रदर्शन इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) यांनी आयोजित केले होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात गडकरी म्हणाले की, बांबूची मागणी वाढविण्याची आवश्यकता आहे. बांबूमध्ये अशी क्षमता आहे, की त्याचा कोळशाला पर्याय म्हणून वापर करता येऊ शकतो आणि त्याचा वापर बांधकामातही केला जाऊ शकतो.
सर्व हितसंबंधितांनी एकात्मिक प्रयत्न केल्यास भारतातील बांबू उद्योग 25-30 हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी आशाही गडकरी यांनी व्यक्त केली. बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासंदर्भातील योजनेसाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही गडकरी यांनी यावेळी दिले.