तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करावे : कृषिमंत्री

नाशिक, दि. १४ : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नाशिक जिल्हा बँकेला ८७० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असुन, हा निधी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

नाशिक जिल्हा परिषदेत कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कृषी व कोरोना साथरोग व इतर विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार भारती पवार, आमदार दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, सभापती अर्थ व बांधकाम समिती सयाजीराव गायकवाड, समाजकल्याण समिती सभापती सुशिला मेंगाळ, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, खरीप पीक हंगामासाठी सध्या पोषक वातावरण असुन शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व शेती अवजारे खरेदीसाठी वित्तीय उपलब्धीची आवश्यकता असते. म्हणून शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आठवडाभरात निधी उपलब्ध करून, शेतकऱ्यांच्या पीक विमा कर्ज व इतर कर्ज खात्यावर परस्पर जमा न करता त्यांना थेट त्याचा लाभ देण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच पीक कर्जाचा पुरवठा वेळेत झाल्यास जिल्ह्यातील बँकांची कामगिरी व विश्वासार्हता यातून निदर्शनास येईल. यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाल्यास संबंधित बँकांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

सदर बैठकीत आरोग्य विभागाचा आढावा घेताना श्री. भुसे यांनी सांगितले, ज्या तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे तेथे स्वतंत्र आरोग्य यंत्रणा न राबवता सदर रूग्णांना लगतचा तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी स्तलांतरित करावे, जणेकरून ही आरोग्य यंत्रणा इतर ठिकाणी सेवा देवू शकेल. तसेच ग्रामपंचायतींच्या समन्वयाने गावपातळीवर कोरोना रूग्ण तपासणीसाठी कॅम्पसचे आयोजन करण्यात यावेत. कोरोना झालेल्या रूग्णांची मानसिकता खचते, अशा वेळी रुग्णांना सकारात्मक मानसिक बळ देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रूग्णांसाठी मनोरंजनाच्या सुविधा उपलबध करून द्याव्या, अशा सूचनाही मंत्री भुसे यांनी दिल्या.

यावेळी श्री.मंत्री भुसे यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांना सध्या मेंढीवर आढळणाऱ्या लंगड्या आजाराची माहिती घेऊन या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना राबविण्यास पशुसंवर्धन विभागास सांगितले आहे. जिल्ह्यातील २३०० शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ज्या आदिवासी भागात ऑनलाईन शिक्षणप्रणाली प्रभावीपणे पोहचू शकत नाही. त्या ठिकाणी शिक्षकांनी स्वत: जाऊन विविध उपाययोजनेद्वारे कसे शिक्षण देता येईल, याचा प्रयत्न करावा. तसेच ग्रामीण भागात ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईलची व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी शिक्षक मित्र, गल्ली मित्र संकल्पना राबविण्यात यावे असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

बांधावर खतांचा पुरवठा करण्यात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल

जिल्ह्यात जून महिन्यात २३३.१० मि.मी तर १ जुलै ते १३ जुलै २०२० पर्यंत ७५.८० मि.मी प्रत्यक्ष पर्जन्यमान झाल्याचे सांगितले. आज रोजीपर्यंत जिल्ह्यात खरीप हंगाम अंतर्गत ४ लाख ९ हजार ३६ पुर्णांक ४३ हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष पेरणीखाली असून, एकूण ७३.६३ टक्के पेरणी झाली आहे. यात भात, नागली व वरई या पिकांची पुनर्लागवड सुरू आहे. बाजरी, सोयाबीन, तुर, मुग, उडीद, भुईमुग, कापूस व मका पीक सुद्धा उगवण व वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. तसेच खरीप कांदा हा जिल्ह्याच्या पूर्व भागत लागवडीखाली आहे. जिल्ह्यात प्रस्तावित क्षेत्रासाठी ९७ हजार ६९४ क्विंटल बियाणे मागणीपैकी प्रत्यक्ष पुरवठा ९७ हजार १०२ क्विंटल इतका झाला आहे.

रासायनिक खतांचे आवंटन २.११ लाख मे.टन आहे यापैकी आजपर्यंत १ लाख ९ हजार ५४३ मे.टन खत पुरवठा करण्यात आला आहे. राज्यात बांधवर खतांचा पुरवठा करण्यात नाशिक जिल्हा अव्वल ठरला आहे. यामध्ये कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर बांधावर बियाणे व खते पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यात आजपर्यंत ७६१० गटांमार्फत ४८ हजार २१३ पुर्णांक ५६ मे. टन खते व ३५ हजार ५४८ पुर्णांक ९० क्विंटल बियाणांचा पुरवठा बांधावर करण्यात आला आहे. पिकांच्या गुणवत्ता नियंत्रणसाठी जिल्ह्यात ४४ गुण नियंत्रण निरीक्षक, प्रत्येक तालुक्यात एक आणि‍ जिल्हास्तरीय एक अशी १६ भरारी पथके व जिल्हा स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापना करण्यात आले असून शेंदरी बोंडअळी, मक्यावरील नवीन लष्करी अळी व कीटकनाशके फवारणी याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.

जिल्ह्यात खरीप हंगाम शेतकरी शेतीशाळा अंतर्गत एकूण ५२८ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले असून यात २५ टक्के महिलांनी सहभाग घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजना २०१९-२० अंतर्गत जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १ लाख ९८ हजार ५१२ शेतकरी सहभागी झाले होते. यातून १ लाख ८८ हजार ७७२ शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे असे श्री. पडवळ यांनी अहवाल सादरीकरणात सांगितले. तसेच यावेळी प्रभारी कृषी अधिकारी, माधुरी गायकवाड यांनी सुद्धा यावेळी जिल्हा परिषद, कृषी विभाग आढावा सादर केला.

सदर बैठकीत मंत्री श्री. भुसे म्हणाले, मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव व मुग पीक किड रोखण्यासाठी प्रभावी उपायायोजना करुन, शेतकरी बांधवांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन करावे तसेच ज्या ठिकाणी बियाणांच्या तक्रारी आल्या आहेत तेथे तात्काळ सदोष बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे. निफाड तालुक्यात काही ठिकाणी डाळींब पिकावर तेलकट डाग दिसून येत आहेत. त्यावर सुद्धा उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्हा पातळीवर खत व बियाणे पुरवठादारांच्या परवाने नुतनीरकण पेन्डंसीबाबत माहिती घेऊन त्याचा अहवाल सादर करावा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना लवकरच कार्यान्वित होणार असून, शेतकऱ्यांना पाठबळ देऊन चिंतामुक्त व सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी पीक विमा संदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा विमा ऐच्छिक स्वरूपाचा करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचे लाभ आता शेतकऱ्यांना घरबसल्या सिंगल पेज ॲप्लीकेशन याद्वारे ऑनलाइन घेता येणार असून सर्व प्रकराच्या योजनांसाठी एकच अर्ज असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.