कोविड बाधितांचा आकडा वाढत असलेल्या राज्यांना कोविड – 19 वर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारचा पाठींबा
देशातील महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये दैनंदिन पातळीवर नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होण्याचा कल कायम आहे. गेल्या 24 तासांच्या कालावधीत देशभरात नोंद झालेल्या नव्या कोविड रुग्णांपैकी 86.25% रुग्ण या सहा राज्यांमधील आहेत.
गेल्या 24 तासांत, 18,599 नव्या कोविड ग्रस्तांची नोंद झाली.
महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवरील सर्वाधिक म्हणजे 11,141 रुग्णांची नोंद झाली असून त्यापाठोपाठ केरळमध्ये 2,100 तर पंजाब मध्ये 1,043 नवे रुग्ण सापडले.
दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असलेली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी केंद्र सरकार नियमितपणे उच्च स्तरीय बैठका घेत आहे. जास्त सक्रीय कोविड रुग्ण असणाऱ्या आणि रोज नोंदल्या जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना रोगनियंत्रणासाठी सुरु असलेल्या मोहिमेत सहभागी करून घेण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय आरोग्य सचिव देखील साप्ताहिक पातळीवर बैठका घेत आहेत.
महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये नजीकच्या काळात कोविड रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झालेली दिसून आली. या पार्श्वभूमीवर कोविड – 19 आजाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन यांच्या उपाययोजनांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी नुकतेच केंद्र सरकारने एक उच्च स्तरीय पथक पाठविले होते.
तसेच, कोविड -19 रुग्णांमध्ये अचानकपणे होत असलेली वाढ रोखण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन मिळावे म्हणून केंद्र सरकारने या आधीच महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल तसेच जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये उच्च स्तरीय पथके पाठविली आहेत.
ही पथके, या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्यापुढील समस्या आणि आव्हानांची नेमकी गंभीरता जाणून घेत आहेत जेणेकरून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रद्शांमध्ये सध्या सुरु असलेल्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी किंवा काही अडचणी असतील तर त्यांचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणे सोपे जावे.
देशातील 8 राज्यांमध्ये कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे.
भारतातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या आज 1,88,747 वर पोहोचली. देशातील सक्रीय रुग्णसंख्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.68% आहे.
देशात आतापर्यंत झालेल्या कोविड चाचण्यांनी 22 कोटींचा आकडा पार केला आहे (22,19,68,271). एकूण राष्ट्रीय कोविड पॉसिटीव्हीटी दर सध्या 5.06% इतका आहे.
देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साप्ताहिक कोविड पॉसिटीव्हीटी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त (2.29%) आहे. महाराष्ट्रात साप्ताहिक कोविड पॉसिटीव्हीटी दर सर्वात जास्त म्हणजे 11.13% आहे.
आज सकाळी 7 वाजताच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 3,76,633 सत्रांच्या माध्यमातून लसींचे 2.09 कोटींहून जास्त म्हणजे 2,09,89,010 डोस देण्यात आले आहेत.
यापैकी, 69,85,911 आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि 66,09,537 आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्धे यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 35,47,548 आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि आघाडीवर काम करणाऱ्या 2,13,559 कोरोना योद्ध्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. त्याचबरोबर, विशिष्ट सहव्याधी असलेल्या आणि 45 वर्षांहून जास्त वय असणाऱ्या 4,80,661 लाभार्थ्यांना तसेच 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 31,51,794 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांत 97 रुग्ण कोविडमुळे मृत्युमुखी पडले.
या नव्या मृत्यूंपैकी 87.63% मृत्यू, देशातील 7 राज्यांमध्ये झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक 38 तर पंजाबमध्ये 17 आणि केरळमध्ये 13 रुग्णांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला.
देशातील अंदमान-निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, चंदीगड, दिव-दमण आणि दादरा नगर हवेली, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, लडाख (कें.प्र.), मणिपूर, मिझोरम, नागालँड, ओदिशा, पुदुचेरी, राजस्थान, सिक्कीम आणि त्रिपुरा या 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे एकही मृत्यू नोंदला गेला नाही.