मुंबई, दि. ६ :- इतिहास ज्याप्रमाणे वेगवेगळ्या कालखंडात विभाजित केला जातो, तसे साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य कालखंडात विभाजित करता येत नाही. संत साहित्य मग ते हिंदी भाषेतील असो, मराठी, कन्नड, ब्रज, मिथिली, अवधी भाषेतील असो, त्यातील भक्तिभाव समान असतो. भारतीय साहित्य शाश्वत, चिरंतन व आनंददायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. करुणाशंकर उपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘मध्यकालीन कविता का पुनर्पाठ’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. ६) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
संत साहित्य गोस्वामी तुलसीदासांचे असो, समर्थ रामदासांचे असो किंवा जैन मुनींचे असो, त्यातील प्रस्तुतीकरण वेगवेगळे असले तरीही त्यातील आनंद तोच असतो. हाच आनंद रामायण धारावाहिक पाहतानादेखील येतो. देशात अनेकदा परकीय आक्रमणे झाली परंतु देशातील साहित्य सागर कधीही आटला नाही व आटणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
‘मध्यकालीन कविता का पुनर्पाठ’ हे पुस्तक भारतीय साहित्याच्या पुनरूत्थानाचे कार्य करेल, असे सांगून हे पुस्तक साहित्यिक, टीकाकार व पत्रकार सर्वांना उपयुक्त सिद्ध होईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
या पुस्तकामध्ये मध्ययुगीन काळातील संत व कवी नामदेव, कबीर, सुफी संत जायसी, सूरदास, गोस्वामी तुलसीदास, संत जाम्भोजी, संत वील्होजी, आचार्य नित्यानंद शास्त्री यांच्या लिखाणाचे वर्तमान संदर्भामध्ये परीक्षण करण्यात आले आहे.
राधाकृष्ण प्रकाशन या संथेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये खालील प्रकरणांचा समावेश आहे. भक्तिकाव्य और उत्तर – आधुनिकता, वैश्वीकरण के दौर में संत नामदेव के काव्य की प्रासंगिकता, भारतीय योग परम्परा और कबीर, कबीर साहित्य में गुरु का वर्तमान सन्दर्भ, रामचन्द्र शुक्ल के कबीर सम्बन्धी मूल्यांकन का पुनर्पाठ, सूफी काव्य का समाजशास्त्र और वर्तमान समय, जायसी का विरह – वर्णन, पुष्टिमार्ग और सूरदास, रामायण और रामचरितमानस में प्रतिष्ठित मूल्यों की सार्वभौमिकता.