पक्ष्यांपासून माणसांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग झाल्याची नोंद नाही

मुंबई, दि. 5 : पक्ष्यांपासून माणसांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग झाल्याची नोंद नसल्याचा अहवाल भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत भोपाळ येथे पाठविण्यात आलेल्या 175 रोग नमुन्यांपैकी 74 नमुने होकारार्थी आढळून आल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानसभेच्या लेखी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

राज्यात मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याबाबत सदस्य सर्वश्री मंगेश कुडाळकर, संजय पोतनीस, सुनील भुसारा, श्रीमती यामिनी जाधव यांच्यासह सुमारे 61 सदस्यांनी लेखी प्रश्न  विचारला होता. त्याच्या लेखी उत्तरात मंत्री श्री.केदार यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या अहवालानुसार राज्यातील 24 जिल्ह्यात कुक्कुट तसेच अन्य पक्षांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. विविध पक्षांच्या मर्तुकीमध्ये गिधाडाचा समावेश आढळून आलेला नाही. मृत पावलेल्या पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावरील भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या अंतीम अहवालानुसार रोग प्रादुर्भाव घोषित करण्यात येतो.

नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्यासह या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारित कृती आरखड्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे, असे श्री. केदार यांनी सांगितले.