राज्यातील शेवटच्या गावापर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हीटी पोहोचावी म्हणून प्रयत्न

कोविड संकटाचे संधीत रूपांतर केले

मुंबई, दि. २० : कल करे सो आज कर, आज करे सो  अभी अशी राज्य शासनाची भूमिका असून कोविड  काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही तर आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही  बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.

कार्यालयीन वेळांचे नियोजन, धोरण आखावे

कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्ही आपत्तीला संधीमध्ये बदलवीत आहोत. गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहचणे आमचे उद्दिष्ट्य आहे. भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळे पसरविणे सुरु असले तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावे व खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहोचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात लवकर कशी मिळेल ते पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत असेही ते म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत असून केंद्राने अशा प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.