मी संदेश बाळगोंडा पाटील, आरग ता.मिरज जि. सांगली या गावचा रहिवासी. माझा उदरनिर्वाह वडिलोपार्जित शेतीवर अवलंबून आहे. शेतीच्या कामासाठी मी गावातील आरग विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज घतलं. पण निसर्गाची साथ न लाभल्यानं उत्पादन आणि खर्च यांचा ताळमेळ न बसल्यानं उत्पन्न घटत गेलं. सोसायटीच्या कर्जाचे हप्ते भरणेसुद्धा थांबले. कर्जाची थकबाकी वाढेल यामुळे मानसिक त्रास खूप होत होता. कर्जाचा बोजाही वाढत चालला होता. शेतीसाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न सतत सतावत होता.
महाविकास आघाडी शासनानं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली आणि योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात केली. मी गावातील विविध कार्यकारी सोसायटीत जाऊन भेटलो. कर्जमुक्तीसाठी लागणारी कागदपत्र जमा करण्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार मी सर्व कागदपत्रे सोसायटीमध्ये जमा केली. शासनानं कर्जमुक्तीची पहिली यादी घोषित केली. या यादीमध्ये मला स्थान मिळालं. या कर्जमुक्तीमध्ये माझे 72 हजार रूपये इतक्या थकबाकीचे कर्ज माफ झाले. यामुळे मला खूप दिलासा मिळाला. या कर्जमाफीमुळं माझ्या मनावर असणारे दडपण कमी झाले. कर्जमाफी झाल्यामुळं माझे शेती करण्यासाठी मनोबल आणखी वाढले. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमुळं सोसायटीमधील माझ्यावर असणारा कर्ज बोजा कमी झाल्यानं मी आता चांगल्या पद्धतीनं आणि नव्या उमेदीनं शेती करण्यास सुरुवात केली आहे. शासनानं दिलेल्या कर्जमाफीसाठी मी शासनाचा मनापासून आभारी आहे.