भारत हा जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहकही असून आता भारताने डाळींच्या उत्पादनात जवळपास स्वयंपूर्णता साध्य केली आहे, असे प्रतिपादन, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. गेल्या पाच-सहा वर्षात, भारतातील डाळींच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून ते 140 लाख टनांपासून ते 240 लाख टनांपर्यंत वाढ झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.जागतिक डाळी दिवसा’निमित्त रोम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे भाषण केले.
2019-20 या वर्षात भारताने 23.15 दशलक्ष टन डाळींचे उत्पादन केले, जे जागतिक उत्पादनाच्या 23.62% टक्के आहे, असेही ते म्हणाले.
डाळींच्या महत्वाविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की डाळी अत्यंत पोषक असून त्यांच्यात प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळेच एक अन्नघटक म्हणून तो महत्वाचा आहे. विशेषत: भारतासारख्या देशात, जिथे शाकाहारी लोकांचे प्रमाण अधिक आहे, तिथे आहारात डाळींना विशेष महत्व आहे. डाळींन कमी पाणी लागते आणि ती कोरडवाहू जमिनीवर देखील पिकू शकते.
डाळींची मागणी आणि पुरवठा यातील, तफावत भरुन काढण्यासाठी केंद्र सरकर डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. “आमच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि इतर योजनांमध्ये डाळींचा एक प्रमुख अन्नघटक म्हणून कायम समावेश केला जाईल. भातपिक घेतल्यानंतरच्या जमिनीवर डाळींचे पिक घेऊन आणि नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन तसेच आवश्यक तो कृषी खर्च करुन डाळींचे उत्पादन वाढवण्यात आले आहे.” असे त्यांनी सांगितले.
कृषी उपक्रमांविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की भारतात 86 टक्के छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करुन अशा शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य केले जात आहे. केंद्र सरकार देशभरात 10,000 नव्या शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करत असून त्यासाठी येत्या पाच वर्षात 6,850 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या संघटनांमुळे, शेतकऱ्यांना बियाणे उत्पादन, खरेदी यात मदत होईल तसेच उत्तम तंत्रज्ञान उपलब्ध होईल.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने केलेल्या कामांचे कौतुक करतांनाच त्यांनी सांगितले की त्यांच्या संशोधन आणि विकास कार्यांमुळे डाळींचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत मिळाली आहे. डाळींच्या पिकांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली असून डाळींच्या नव्या संकरित वाणांवर अभूतपूर्व संशोधन करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षात,डाळींच्या 100 सुधारित आणि उत्तम पिक देणाऱ्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
डाळींचे महत्व सांगतांना तोमर म्हणाले की भारतात, राष्ट्रीय पोषाहार योजनेअंतर्गत 1.25 कोटी आंगणवाड्यांमध्ये डाळींचे वाटप केले जाते. टाळेबंदीच्या काळातही, केंद्र सरकारने 80 कोटी गरिबांना मोफत चणाडाळींचा पुरवठा केला. कोविडच्या अडचणी असतांनाही भारत आज अन्नधान्याच्या उत्पादनांचा जागतिक निर्यातदार/पुरवठादार झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार 2016 पासून जागतिक डाळी दिवस साजरा केला जातो.
या कार्यक्रमाला, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस डॉ अग्नेस कलिबाता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.