नाविन्यपूर्ण धोरणांतून ग्रामीण भागात बदल घडवून आणण्याचे आवाहन

नाविन्यपूर्ण, संशोधनावर आधारित विशेषतः ग्रामीण भागासाठी चिरकाल टिकणारा ,अमूलाग्र बदल घडवून आणण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात एका कार्यशाळेमध्ये संबोधित करताना त्यांनी नमूद केले की, ग्रामीण उद्योग आणि खादी उद्योग वर्षाला 88,000 कोटी रुपयांचे उत्पादन करतात. जर लवचिक, नाविन्यपूर्ण धोरणे असतील आणि खेड्यातल्या लोकांचे जीवनमान सुधारण्याचे उद्दिष्ट असेल तर यामध्ये वाढ होऊ शकते. ग्रामीण उद्योगांमधून तयार झालेल्या उत्पादनांचे विपणन योग्य पद्धतीने झाले तर त्यांची विक्री देखील चांगल्या प्रकारे होऊ शकते, यावर मंत्र्यांनी भर दिला.

महात्मा गांधी, विनोबा भावे, पंडीत दीनदयाळ उपाध्याय, राम मनोहर लोहिया, आणि जयप्रकाश नारायण यांच्या  तत्वांची  आठवण करून देत ते म्हणाले, त्यांचे उद्दिष्ट एकच होते- खेड्यातील गरीबांचे जीवनमान सुधारणे. खेड्यांमध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते, हे जोपर्यंत सुनिश्चित होऊ शकत नाही, आणि खेडी ही स्वच्छ आणि पुरेशा सुविधांनी परिपूर्ण असल्याचे सुनिश्चित होत नाहीत, तोपर्यंत या नेत्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या विकासाअभावी स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागातून स्थलांतरित झाली आहे, असे मंत्री म्हणाले.

भारताच्या जीडीपीच्या 30 टक्के योगदान एमएसएमईचे असून ते 6.5 कोटी युनिट्स असल्याचे निदर्शनास आणत, गडकरी म्हणाले, सरकारचे उद्दिष्ट आहे की, हे योगदान जीडीपीच्या 40 टक्क्यांपर्यंत वाढले पाहिजे,  त्यासठी खेड्यातील गरीबांना त्याचा फायदा होईल. धोरण असे आखले गेले पाहिजे, की ज्यामुळे गरीबांचे सक्षमीकरण होईल . मंत्री म्हणाले, “खेड्यांच्या बाबतीत आम्ही पाश्चिमात्यीकरणाच्या बाजूने नाही, पण आम्ही आधुनिकीकरणाच्या बाजूने आहोत. ही वेळ सामाजिक- आर्थिक परिवर्तनाची आहे.”