गडकरी यांची घोषणा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केले की, नवीन वर्षात देशात सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयाची येत्या दि. 1 जानेवारी, 2021 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एका आभासी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले, दि. 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग अनिवार्य करण्यात येईल. यामुळे वाहनांना पथकर नाक्यांवर अजिबात थांबावे लागणार नाही की पथकर रोख देण्यासाठी रांग लावावी लागणार नाही. वाहनधारकांचा वेळ आणि इंधन यांच्यात बचत होऊ शकणार आहे.
फास्टॅग वापरण्यास सन 2016 प्रारंभ झाला. 2017 पर्यंत चार बँकांनी मिळून जवळपास एक लाख वाहनांसाठी फास्टॅग वितरित केले होते. त्यानंतर फास्टॅग वापरणा-या वाहनांची संख्या वाढून ती 7 लाखांपर्यंत पोहोचली. त्यानंतर 2018 मध्ये 34 लाखांपेक्षा जास्त फास्टॅग वितरित करण्यात आले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यंदा नोव्हेंबरमध्ये एक अधिसूचना काढून सर्व वाहनांसाठी 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे ज्या वाहनांची विक्री डिसेंबर 2017 च्या आधी झाली आहे, त्यांच्यासाठी सीएमव्हीआर, 1989 मध्ये दुरूस्ती करून त्या वाहनांनीही फास्टॅग लावून घेण्याचे निर्देश आधीच देण्यात आले आहेत.
केंद्रीय मोटार वाहन कायदा, 1989 अनुसार, 1डिसेंबर 2017 पासूनच फास्टॅग अनिवार्य असून नवीन चारचाकी वाहनांना नोंदणीच्या वेळीच फास्टॅगचा पुरवठा वाहन उत्पादकांनी अथवा त्यांच्या वितरकांनी करावा, असे स्पष्ट केले होते. तसेच वाहनाच्या ‘फिटनेस’ प्रमाणपत्राचे नूतनीकरण फास्टॅग नुतनीकरनानंतरच करता येईल. 1 आॅक्टोबरपासून 2019 पासून राष्ट्रीय परमिट धारक वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक आहे.
वाहनधारकांनी तृतीय पक्षाचा विमा उतरवताना फास्टॅगची वैधता त्याच्याशी संलग्न केली आहे. यासाठी फॉर्म 51 म्हणजे विमा प्रमाणपत्राच्या नियमामध्ये दुरूस्ती करण्यात आली असून विमा प्रमाणपत्रामध्ये फास्टॅग ओळख क्रमांक आणि इतर तपशील नमूद करण्यात येत आहे. फॉर्म 51 म्हणजेच तृतीय पक्षाच्या विमा उतरविण्याच्या नियमाची अंमलबजावणी दि. 1 एप्रिल, 2021 पासून होणार आहे.
फास्टॅगमुळे पथकर चुकवून कोणतीही वाहने पुढे जाऊ शकणार नाहीत. इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे 100 टक्के पथकर वसुली साध्य होऊ शकणार आहे. त्याचबरोबर वाहनांना पथकर भरण्यासाठी थांबावे लागणार नाही, पथकर नाक्यांवर रांगा लागणार नाहीत, वाहतुकीची कोंडी होणार नाही, त्यामुळे मोठया प्रमाणावर इंधन बचत होणार आहे.
सर्व वाहनांना फास्टॅग उपलब्ध व्हावा, यासाठी विविध मार्गांनी उपाय योजना करण्यात येत आहेत. यासाठी वाहनांना प्रत्यक्ष फास्टॅग लावणे, ऑनलाइन यंत्रणेमार्फत वाहनधारकांना फास्टॅग उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आगामी दोन महिन्यात सर्व वाहनांनी फास्टॅग लावून घेण्यासाठी सुविधा देण्यात येत आहेत.