राज्यात २ लाख ५३ हजार ८८० रोजगार उपलब्ध होणार

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात एकूण २ लाख कोटींची गुंतवणूक -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करुन महाराष्ट्राने मागील वर्षभरात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. कोविड संकटाच्या काळात सहा महिन्यातच एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे 25 भारतीय कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत 61 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून 2 लाख 53 हजार 880 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन, उद्योग प्रतिनिधी म्हणून जिंदाल ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल तसेच विविध कंपन्याचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोविड-१९ चे संकट जगावर असताना सुद्धा महाराष्ट्रात उद्योग विभागाने कमी कालावधीत 2 लाख कोटींचे उद्दिष्ट पूर्ण  केले आहे. हा समाधान, अभिमान वाटेल असा क्षण आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी उद्योगमंत्री श्री. देसाई आणि त्यांच्या टीमच अभिनंदन केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोविडचे संकट टळलेले नाही. सध्या कोरोनाची परिस्थिती समाधानकारक असली तरी युरोपात स्ट्रेन वेगाने पसरतोय. या गुंतवणूकीत पिझ्झा, आईसक्रीम आहे. शेततळे आहे, दूध आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्राला तुमची ताकद मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे.

 

घरातून ताकद मिळाल्यानंतर हत्तीचे बळ मिळते. महाराष्ट्राच्या परिवारातील तुम्ही सर्व आहात. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. देशाच्या प्रगतीची धारणा महत्त्वाची आहे. कष्ट करण्याची तयारी आपल्या अंगी असेल तर नक्कीच महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. उद्योग मित्र ही संकल्पना उत्तम असून त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी लवकर दूर होतील आणि कामाला गती मिळेल. उद्योजकांनी या संकटाच्या काळात देखील महाराष्ट्रात गुंतवणूक केली हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत राहील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना आश्वासित केले.

 

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत उद्योग करारांचा हा तिसरा टप्पा आहे. एक लाखाचा टप्पा पार करत आहोत. खास बाब म्हणजे करार होत असलेल्या सर्व कंपन्या भारतातील आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची उद्योजकांची इच्छा असल्याचे यावरून दिसून येते. यापूर्वी 29 करार झाले आहेत. त्यापैकी 21 उद्योजकांना उद्योगांसाठी जमिनी दिल्या आहेत. प्रत्यक्ष गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रत्येक उद्योगासाठी रिलेशन मॅनेजरची नियुक्ती केली आहे. रोजगार वाढावा, गुंतवणूक यावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.

उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या, जगावर कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचा टप्पा राज्याने गाठला आहे. जवळपास सहा महिन्यात 1 लाख 12 हजार कोटींची गुंतवणूक करुन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करुन दिली, असल्याचे कुमारी तटकरे यांनी सांगितले.

प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी म्हणाले, राज्यातील उद्योग क्षेत्र पुन्हा पूर्वपदावर येत आहे. ज्यांच्याशी करार झाले त्यांना जमिनी वाटप केल्या आहेत. राज्याच्या सर्व भागाचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात येत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, म्हणाले, औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जून, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. हे करार पूर्णत्वास येण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. महापरवानामुळे 21 दिवसांत परवाना दिला जात आहेत. यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. महाजॉब्जमुळे उद्योग आणि नोकरी मागणाऱ्यामध्ये दुवा म्हणून काम शासन काम करत आहे. सेवा, उद्योजकांना औद्योगिक सुविधा पुरवण्यावर अधिक भर आहे.

उद्योजक सज्जन जिंदाल म्हणाले, उद्योजक महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात पुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री श्री.ठाकरे विशेष प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मॅग्नेटीक आहे. संपूर्ण जग या ठिकाणी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. जिंदाल ग्रुपच्या 10 कंपन्या महाराष्ट्रात काम करतात. जवळपास 1 हजार कोटींची गुंतवणूक यामध्ये केलेली आहे. रायगड जिल्ह्यात देशांतील त्यामध्ये सर्वात मोठा स्टील कारखाना सुरू करण्याचा मानस आहे. 40 मिलीयन टन क्षमतेचा हा प्रकल्प असणार आहे.

 

आज झालेल्या सामंजस्य करारामध्ये खालील कंपन्यांचा समावेश

एक्साईड इन्डस्ट्रीज, भारत बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, (500 कोटी गुंतवणूक 1000 रोजगार निर्मिती), श्रीधर कॉटसाइन, वस्त्रोद्योग (369 कोटी गुंतवणूक,520 रोजगार निर्मिती), ज्युबिलन्ट फूड वर्क्स, अन्नप्रक्रिया (150 कोटी गुंतवणूक, 400 रोजगार निर्मिती), जेएसडब्ल्यू स्टील (20 हजार कोटी गुंतवणूक, 3000 रोजगार निर्मिती), गोयल गंगा आयटी पार्क (1000 कोटी गुंतवणूक, 10 हजार रोजगार निर्मिती), जी जी मेट्रोपॉलिस, आयटी पार्क (1500 कोटी गुंतवणूक 15 हजार रोजगार निर्मिती), सेंच्युर फार्मास्युटिकल लिमिटेड, फार्मास्युटिकल (300 कोटी गुंतवणूक, 1500 रोजगार निमिर्ती), ग्रँव्हिस भारत, अन्नप्रक्रिया (75 कोटींची गुंतवणूक, 100 रोजगार निर्मिती), के. रहेजा, माहिती तंत्रज्ञान (7 हजार 500 कोटी गुंतवणूक, 70 हजार रोजगार निर्मिती), इंडियन कॉर्पोरेशन लॉजिस्टीक, लॉजिस्टीक (11049.5 कोटी गुंतवूणक 75 हजार रोजगार निर्मिती), बजाज ऑटो अँड ऑटो कंपोनंट, (650 कोटी गुंतवूणक  2500 रोजगार निर्मिती), सुमेरू पॉलिस्टर एलएलपी, वस्त्रोद्योग (425 कोटी गुंतवूणक, 500 रोजगार निर्मिती), नवापूर इंडस्ट्रीयल पार्क एलएलपी, इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर (200 कोटी गुंतवणूक, 100 रोजगार निर्मिती), कीर्तीकुमार स्टील उद्योग, स्टील उत्पादन (7 हजार 500  कोटी गुंतवणक, 60 हजार रोजगार निर्मिती), इन्स्पायर इन्फ्रा (औरंगाबाद) लि. इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया (7 हजार 500 कोटी गुंतवणूक, 10 रोजगार निर्मिती), जेनक्रेस्ट बायो प्रॉडक्ट, वस्त्रोद्योग (500 कोटी गुंतवणूक, 500 रोजगार निर्मिती), मलक स्पेशालिटीज, केमिकल (45.56 कोटी गुंतवणूक 60 रोजगार निर्मिती), अम्बर एन्टरप्रायझेस इंडिया लि.मॅन्युफॅक्चरिंग  (100 कोटी गुंतवणूक, 220 रोजगार निर्मिती), ग्रॅंड हॅण्डलूम फर्निचर प्रा. लि.वस्त्रोद्योग (106 कोटी गुंतवणूक, 210 रोजगार निर्मिती), अॅम्पस फार्मटेक्स इंडस्ट्रीज, इंजिनिअरींग (104 कोटी गुंतवणूक, 220 रोजगार निर्मिती), क्लिन सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी प्रा.लि., केमिकल (132.4 कोटी गुंतवणूक, 750 रोजगार निर्मिती), सोनाई इडेबल इंडिया प्रा. लि. अन्न, खाद्य तेल रिफायनरी (189.57 कोटी गुंतवणूक, 300 रोजगार निर्मिती), सुनील प्लास्टिक इंडस्ट्रीज, डेव्हलपर (110 कोटी गुंतवणूक, 500 रोजगार निर्मिती), रिन्युसिस इंडिया प्रा लि, तरिन्युएबल एनर्जी (500 कोटी गुंतवणूक, 1500 रोजगार निर्मिती), हरमन फिनोकेम, केमिकल (536.5 कोटी गुंतवणूक, 1500 रोजगार निर्मिती), अशी रु. 61.043 कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. या माध्यमातून 2 लाख 53 हजार 880 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.