राज्यातील भूजल स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत मोठी घसरण होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पाणीपुरवठा, कृषी तसेच मृद व जलसंधारण या तीन विभागांनी एकत्र मिळून काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
वर्षा या शासकीय निवासस्थानी अटल भूजल योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज व घराघरात पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पाणीपातळी वाढविण्याच्या दृष्टीने जलधर पुनर्भरण योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. शिवकालीन पाणी साठवण योजनेचे पुनरुज्जीवन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भूजल पातळी वाढविण्यासाठी जनतेचा सहभाग घ्यावा, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. जनतेमध्ये जलसाक्षरता व जलजागृती निर्माण करावी असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्रपणे बैठक आयोजित करण्याची सूचनाही श्री.ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागतो. येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडसंबंधी प्रस्ताव तातडीने सादर करावा.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात ठिबक सिंचन पद्धतीचा फायदा अनेक लोकांना होत आहे. त्यातून अनेक जणांना रोजगारही मिळतो आहे. त्यावरभर देण्याची गरज असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने जलपुनर्भरण अतिशय महत्त्वाचे आहे. भूजल पातळी वाढविण्याच्या कामात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे.
यावेळी मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे,मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, पुणे चे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.